Latest

खूशखबर : २ ते १८ मुलांसाठी लवकरच कोव्हॅक्सिन लस

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 'कोव्हॅक्सिन' ही  कोरोना लस आपत्कालीन वापरास केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) लवकरच बालकांच्या लसीकरणाला मंजुरी मिळणार असून तसे झाल्यास मुलांना देण्यात येणारी कोव्हॅक्सिन ही देशातील पहिली लस ठरेल.

बालकांवर आपत्कालीन स्थितीत कोव्हॅक्सिनच्या वापरास मंजुरी दिल्याची बातमी मंगळवारी दुपारी पसरली. मात्र तज्ज्ञ समितीशी चर्चा केल्यानंतरच कोव्हॅक्सिन बालकांना देण्यास मंजुरी दिली जाईल. डीसीजीएकडून अशी मंजुरी अद्याप देण्यात आलेली नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी स्पष्ट केले. भारत बायोटेकने सप्टेंबर महिन्यात मुलांवरील या लसीच्या चाचण्या पूर्ण केल्या होत्या.

चाचण्यांची निष्कर्ष, माहिती डीसीजीआयकडे सुपूर्द केली होती. या माहितीच्या पडताळणीनंतर डीसीजीआयकडून अतिरिक्त माहिती कंपनीकडून मागवून घेतली होती. शनिवारी ही माहिती कार्यालयाकडे सादर केली होती. सोमवारी यासंबंधी विशेष तज्ज्ञ समितीची (एसईसी) बैठक झाली होती. मंगळवारीदेखील एसईसीची बैठक बोलावली होती.

कोव्हॅक्सिन पूर्णत: स्वदेशी असून 18 हून कमी वयोगटातील बालकांवर तीन टप्प्यांमध्ये चाचणी घेतली आहे. सप्टेंबरमध्ये दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्याने कोव्हॅक्सिनच्या वापरास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

चाचण्यांमधून बालकांवर या लसीचा कुठलाही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. लस जवळपास 78 टक्के प्रभावी असल्याचे निष्कर्षांअंती समोर आले आहे. प्रौढांप्रमाणे बालकांनादेखील कोव्हॅक्सिनचे दोन डोस देण्यात येतील. ज्या मुलांना दमा तसेच इतर विकार, आजार आहेत, अशा मुलांना लसीकरणात प्राधान्य दिले जाऊ शकते.

मुलांचे लसीकरण : जागतिक स्थिती

* अमेरिकेत मे महिन्यापासून 12 वर्षांवरील सर्व मुलांना फायझरची लस देण्यात येत आहे. पुढच्या वर्षापासून 12 पेक्षा कमी वयाच्या मुलांचे लसीकरणही सुरू होण्याची शक्यता आहे.

* युरोपियन संघाने 23 जुलै रोजी 12 ते 17 वयोगटासाठी मॉडर्ना लसीला मान्यता दिली आहे. लवकरच लसीकरण सुरू होईल.

* ब्रिटनने 19 जुलै रोजी 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना फायझर लस देण्यास मंजुरी दिली आहे. तथापि अन्य अजार असलेल्या मुलांनाच लस देण्याची सध्या परवानगी आहे. सप्टेंबरपर्यंत मॉडर्ना लसीलाही मुलांसाठी मंजुरी मिळणे शक्य आहे.

* इस्रायलमध्ये जूनपासून 12 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. जानेवारीत या देशाने 16 वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण सुरू केले होते.

* कॅनडात सर्वांत आधी मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. डिसेंबर 2020 मध्येच या देशाने फायझर लसीला 16 वर्षांवरील मुलांसाठी मान्यता दिली होती. पुढे मे 2021 मध्ये 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT