Latest

खाशाबा जाधव राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रासाठी कराडात उपोषण

backup backup

कराड ; पुढारी वृत्तसेवा : ऑलिम्पिकवीर स्व. पै. खाशाबा जाधव राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे काम रखडल्याने एस. पी. वडाप फौंडेशनकडून कराडमध्ये सोमवारी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

राज्य शासनाकडून २००९ साली मंजुरी मिळूनही हे काम रखडल्याने राज्यातील खेळाडूंवर मोठा अन्याय होत असल्याचा दावा करत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण केले जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पै. सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये गोळेश्‍वर (ता. कराड) गावचे मल्ल खाशाबा जाधव यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारात देशाला पहिले पदक मिळवून दिले होते.

भारतरत्न पुरस्कार अजुनही नाही

पै. खाशाबा जाधव यांना हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये ५२ किलो वजनी गटात फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळाले होते. दुर्दैवाने देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिल्यानंतरही आजपर्यंत जाधव यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी प्रलंबितच आहे.

त्याचबरोबर ३० जून २००९ रोजी राज्य शासनाने ऑलिम्पिकवीर जाधव राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रास मान्यता दिली होती.

गोळेश्‍वरनजीक होणार्‍या या क्रिडा संकुलाचे काम त्वरित मार्गी लागून जिल्ह्यासह राज्यातील कुस्ती शैकिनांसह मल्लांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा होती.

१९५२ नंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक नाही

मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे. आज देशाला ऑलिम्पिकमध्ये सात पदके मिळाली असूनही दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकाही खेळाडूचा त्यात समावेश नाही.

इतकेच काय पण देशात वैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्रातील स्व. खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यानंतर आजवर एकही पदक महाराष्ट्रातील खेळाडूंना मिळालेले नाही.

स्व. जाधव यांची जयंती व पुण्यतिथीला युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल, अशा उपक्रमांचे शासनाकडून आयोजन होत नाही.

याशिवाय खाशाबा जाधव यांच्या नावाने होणारी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धाही दोन वर्षापासून झालेली नाही.

त्यामुळे ही स्पर्धा व्हावी तसेच राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे काम मार्गी लागावे, या मागणीसाठी सोमवार, २३ ऑगस्टला उपोषण केले जाणार असल्याचे पै. सचिन पाटील यांनी सांगितले असून स्थानिक प्रशासनालाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT