Latest

कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मंडणगडमधील ९ नगरसेवक शिंदे गटात सामील

निलेश पोतदार

मंडणगड ; पुढारी वृत्‍तसेवा; मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालवधीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शहरातील शिवसैनिकांच्या शहर विकास आघाडीतील आठ लोकनियुक्त व एक स्विकृत अशा 9 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 15 जुलै रोजी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाबद्दल नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला आहे. या भेटीसाठी गटनेते विनोद जाधव यांच्यासह नगरसेविका वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, सेजल गोवळे, योगेश जाधव, निलेश सापटे, आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभीळकर, स्विकृत नगरसेवक प्रविण जाधव यांच्यासह उपशहर प्रमुख निलेश गोवळे, चेतन सातोपे, प्रतीक पोतनीस, विनीत रेगे, नरेश बैकर उपस्थित होते.

शहर विकास आघाडी नावाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या या आघाडीच्या हातातून सत्ता थोडक्यात निसटल्याने अनुकूल जनमत असतानाही विरोधात बसावे लागलेले आहे. महाविकास आघाडी व शहर विकास आघाडी यांचे प्रत्येक आठ नगरसेवक निवडून आले व इश्वर चिठ्ठीच्या मदतीने निवडून आलेल्या नगरसेवेकीने महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिल्याने शहर विकास आघाडी सत्तेपासून वंचित राहिली. राज्यातील सध्याचे सत्तातरांचे परिणाम ग्रामिण भागावरही होत असल्याने सध्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत चलबिचल सुरु आहे. त्यातच शहर विकास आघाडीने शिंदे गटाचे अधिकृतपणे समर्थन केल्याने शहर विकास आघाडीचे समर्थक नगरसेवक राज्यातील नवीन सत्ताकरणाचे समर्थक झालेले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT