जांबोटी : पुढारी वृत्तसेवा
चार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीआधी दुभंगलेली मने गुरुवारी एकत्र आली. खानापूर म. ए. समितीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी हब्बनहट्टीच्या स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रावर एकत्र येऊन ऐक्याची घोषणा केली. शिवाय 4 एप्रिलनंतर पुन्हा बैठक घेऊन कार्यकारिणीची फेररचना करण्याचा निर्धार केला. तत्पूर्वी तालुक्यातील जनतेमध्ये एकीबाबत जागृती केली जाणार आहे. आजच्या निर्णयाबरोबर खानापुरातील समिती नेत्यांनी एकी करावी, ही मागणी पूर्ण झाली आहे. सुमारे पाच तास चर्चा करत दोन्ही गटांतील गैरसमज दूर करण्यात आले. त्यानंतर पाच जणांची नियुक्ती करून त्यांच्यावर समितीच्या पुढच्या बैठकांची तसेच एकीबाबत जनजागृतीची धुरा सोपवण्यात आली. शिवाय गुढी पाडव्याला पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर पाटील व देवाप्पा गुरव होते. माजी जिल्हा पं. सदस्य विलास बेळगावकर यांनी स्वागत करताना समितीचा इतिहास आणि गेल्या चार वर्षांतील चुकांचा आढावा घेतला.
खानापूर तालुका हा समितीचा बालेकिल्ला होता. मात्र 2018 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून फूट पडली आणि समिती नेते एकमेकांविरुद्ध लढले. परिणामी समितीला निवडणुकीत अपयश आले. त्यानंतर पुढच्याच वर्षापासून म्हणजे 2019 पासून दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी मागणी खानापूर तालुक्यातील समितीप्रेमींकडून होऊ लागली. एकीसाठी याआधीही प्रयत्न झाले. मात्र यश आले नव्हते. एकी झाली तरी पुढच्या विधानसभा निवडणुकीचा उमेदवार कोण, यावरून वाद कायम होता. मात्र माजी आमदार अरविंद पाटील भाजपवासी झाल्याने एकीसाठी अन्य नेत्यांनी पुढाकार घेतला.
त्यानसार गुरुवारी हब्बनहट्टी स्वयंभू मारुती देवस्थान येथे झालेल्या बैठकीत एकी झाली. त्यामुळे पुन्हा सीमाप्रश्नाला बळकटी मिळाली आहे. परिणामी तालुक्यातील मराठी माणसातून समाधान व्यक्त होत आहे. बैठकीत मारुती परमेकर, यशवंत बिर्जे, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, गोपाळ पाटील यांची भाषणे झाली. समिती अध्यक्ष देवप्पा गुरव, अनिल पाटील, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, अविनाश पाटील, बाळाराम शेलार, सूर्याजी पाटील, बळीराम पाटील, रणजित पाटील, धनंजय पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
समितीची पाळेमुळे बळकट करण्यासाठी तसेच एकीच्या निर्णयाबाबत जागृती करण्याची जबाबदारी आबासाहेब दळवी, डी. एम. भोसले, कृष्णा कुंभार, पुंडलिक पाटील, शिवाजी पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.