Latest

उष्णतेची लाट कशावरून ठरवतात? जाणून घ्या अधिक

अनुराधा कोरवी

नवी दिल्‍ली ः सध्या उन्हाळा वाढू लागला आहे आणि 'उष्णतेची लाट' वगैरे शब्दही कानावर पडू लागले आहेत. भारतीय वेधशाळेकडून उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला जात असतो. ही उष्णतेची लाट कशावरून ठरवली जाते, याबाबत अनेकांना कुतूहल असू शकते.

उष्णतेची लाट ही फक्‍त उकाडा किंवा उष्मा अधिक जाणवायला लागला म्हणून घोषित होत नाही. ज्यावेळी सामान्य भागातील तापमान 40 अंश सेल्सिअस आणि डोंगरी भागातील तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जाऊ लागते, त्यावेळी उष्णतेची लाट आली आहे, असे समजले जात असते.

सामान्य तापमानापेक्षा 4.5 ते 6.4 अंश सेल्सिअसइतकी वाढ ज्यावेळी दिसून येते त्यावेळी उष्णतेची लाट आली, असे समजण्यास हरकत नाही. भारतात अशी लाट येण्याचा कालावधी हा मार्च ते जून हा असतो. यावर्षी मार्चमध्येच ही लाट घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत काय होईल, याची आपण कल्पना करू शकतो. राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भ हे अती उष्णतेचे विभाग समजले जातात; मात्र अन्यही अनेक ठिकाणे उष्णतेच्या लाटेच्या फेर्‍यात अनेकदा येत असतात.

अतिउष्णतेच्या भागात मे महिन्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जात असते. या सर्वांची नोंद घेण्यासाठी 'इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट' म्हणजेच भारतीय वेधशाळा ही संस्था कार्यरत आहे. तापमान, आर्द्रता, दाब, वार्‍याचा वेग अशा गोष्टींवरून ही संस्था उष्णतेची लाट व अन्य बाबींची माहिती देत असते. वेधशाळेकडून तापमानाचे एक दिवस ते तीन महिन्यांपर्यंतचे अंदाज घोषित केले जात असतात. उष्णतेच्या लाटेचेही विविध प्रकार असतात. ते हिरव्या, पिवळ्या, नारंगी आणि लाल रंगांनी दर्शवले जातात.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT