अमरावती; पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन तहसीलदारांना शिविगाळ करणे वरुड मोर्शीचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना चांगलेच महागात पडले. शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 27 फेब्रुवारी 2013 रोजी वरुड तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही घटना घडली होती.
सूवर्ण जंयती राजस्व अभियानाची यशोगाथा तयार करणे सुरु असताना सभागृहात आमदार भुयार काही नागरिकांना घेऊन आत शिरले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला? असे प्रश्न करून भूयार यांनी तत्कालीन तहसिलदार राम अरुण लंके यांना शिविगाळ केली. त्यांना मारण्याची धमकी देऊन माईक फेकून मारला.
अशा आशयाच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला होता. वरुडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी अभियोक्ता सुनित ज्ञानेश्वर घोडेस्वार यांनी न्यायालयात एकुण पाच साक्षीदार तपासले.
दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आरोपीविरुध्दचा भादंविची कलम 353 अन्वये गुन्हा सिध्द झाला.
न्यायालय (क्रमांक 1) चे न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने आरोपी देवेंद्र भूयार यांना भादंविच्या कलम 353 नुसार तीन महिने सक्तमजुरी, 15 हजाराचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, तसेच कलम 294 नुसार, दोन महिने सक्तमजुरी, 10 हजाराचा दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास, कलम 506 नुसार तीन महिने सक्तमजुरी, पंधरा हजाराचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कारावासाची शिक्षा सुनावली. तिन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहे.
अपील करणार : भुयार
जानेवारी २०१३ मध्ये २००० क्विंटल ज्वारी वरुड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी आणली होती. त्या कालावधीत अवकाळी पाऊस आला. त्यामुळे करजगाव येथील शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली. त्यामुळे तहसीलदार यांना सदर बाब लक्षात आणून दिली, परंतु सदर ज्वारी मोजण्यास प्रशासकीय यंत्रणा तयार नव्हती. ज्वारीला पाण्यामुळे कोंबे फुटली होती. त्यामुळे त्यांना वारंवार लक्षात आणून दिले. परंतु प्रशासकिय यंत्रणा मान्य करीत नव्हती. दोन दिवसानंतर सदर ज्वारी मोजली. सदर कारणामुळे माझ्यावर प्रशासकीय यंत्रणांनी तत्कालीन शासनाच्या दबावाखाली माझा आवाज दाबण्यासाठी व माझे नेतृत्व दाबण्यासाठी षडयंत्र रचून गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने दिलेला निकाल मला मान्य आहे. वर्षभरात असे 365 गुन्हे दाखल केले तरी मान्य आहे. मी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न करीत राहील. आता शासनात अशा प्रकारचे अधिकारी यांना वठणीवर आणण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन.
– आमदार देवेंद्र भुयार