Latest

यवतमाळमध्ये तासाभरात २ एटीएम फोडून २१ लाखांच्या रकमेवर डल्ला

अविनाश सुतार

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : तासाभराच्या अंतरात दोन एटीएम फोडून चोरट्यांनी २१ लाख रोख रक्कम (robberry) पळविली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून महागाव परिसरासह नागपूर, बोरी, तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेले एटीएम चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. हिवरासंगम व आर्णी येथील घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. त्यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला व १ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास (robberry) केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. अवघ्या दहा मिनिटांत चोरट्यांनी एटीएम मशीनमधून रोख रक्कम काढली. जाताना एटीएमचे शटर बंद केले. त्यामुळे ही घटना सकाळी ९ वाजेपर्यंत उघडकीस आली नाही.

दरम्यान, हिवरा संगम बसस्थानक परिसरात पुसद, माहूर रोडवर पांढऱ्या रंगाची कार जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे. हिवरासंगमची घटना घडल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांतच २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्णी येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले. येथेही चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे फवारला. त्यामुळे घटनाक्रम कॅमेऱ्यात आला नाही. चोरट्यांनी गॅसकटरचा वापर करीत एटीएमचे लॉकर तोडले. या दोन्ही एटीएमवर सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. तसेच सुचना देणारी यंत्रणाही उपलब्ध नव्हती. आर्णीतील एटीएममधून २० लाख ४३ हजारांची रोख चोरट्यांनी काढून घेतली. २. ४५ वाजता पैसे घेऊन ते पसार झाले. हा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. त्यानंतर याची माहिती मनोज वसंत जाधव यांनी आर्णी पोलिसांना दिली.

तहसील चौकातील मुख्य मार्गावरचे एटीएम फोडल्याने येथील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. हा रस्ता वर्दळीचा असतानाही चोरीचा प्रकार कोणाच्याच निदर्शनास कसा आला नाही. या दोन्ही घटनास्थळाला पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर, सायबर सेल टीम, श्वानपथक, ठसे तज्ज्ञांची चमू यांनी भेट दिली. आर्णी येथे श्वानाला कुठलाच सुगावा मिळाला नाही. हिवरासंगम येथे मात्र श्वानाने बसस्थानकापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. नंतर ते घुटमळले. चोरटे वाहनाने पसार झाल्याने श्वानाला पुढील माग दिसला नाही. आर्णी व महागाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : विधानसभा निवडणूक : भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT