Latest

यवतमाळ हादरले! दगडाने ठेचून प्रेयसीचा खून, प्रियकराने ब्लेडने स्वत:चाही गळा चिरला

backup backup

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा:  संशयाचे भुत शिरलेल्या प्रियकराने प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. स्वतःच्या हाताची नस आणि गळा ब्लेडने कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसीलगत असलेल्या जंगलात उघडकीस आली.

आस्था सुरेश तुंबडे (१८) रा. गुरुकृपा सोसायटी जुना उमरसरा असे मृत मुलीचे नाव आहे, तर शुभम अशोक बकाल (२३) रा. शिंदेनगर असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

शुभम हा वडिलाच्या दुचाकीने लोहारा एमआयडीसी परिसरात पोहोचला. त्याने सोबत आस्थाला घेतले. या झुडपी वजा जंगलात दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला, हे स्पष्ट नाही. या वादात संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. त्याने अतिशय निर्दयीपणे आस्थाच्या चेहऱ्यावर दगडाने घाव घातले. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली.

नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत शुभम झुडूपी वजा जंगलातून मुख्य रस्त्यावर आला. तेथे तो योगेश यादव नामक व्यक्तीला दिसला. योगेशने तत्काळ याची माहिती लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांना दिली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी शुभमला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. तर आस्था ही जागेवरच गतप्राण झाल्याचे आढळून आले.

सुरुवातीला प्रेमीयुगुलावर कुणी हल्ला तर केला नाही ना? अशी शंका व्यक्त होत होती. मात्र परिसरातच आरोपी शुभमची दुचाकी आढळून आली. शिवाय आस्थाच्या जवळ तिच्या शाळेची बॅग व इतर कागदपत्रही त्यात आढळून आले. यावरून दोघांची काही तासातच ओळख पटली. त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी आस्थाचे वडील सुरेश तुंबडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शुभम विरोधात कलम ३०२, ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लोहारा पोलीस ठाण्यात सुरू होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT