पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात विजयी अर्धशतक झळकावणा-या जेमिमा रॉड्रिग्जला (jemimah rodrigues) महिला प्रिमिअर लिगमध्ये लॉटरी लागली आहे. 50 लाखांच्या मूळ किमतीसह लिलावाच्या मैदानात उतरलेल्या जेमिमाला दिल्ली कॅपिटल्सने 2.2 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समावेश करून घेतले आहे.
5 सप्टेंबर 2000 रोजी मुंबईत जन्मलेल्या जेमिमाने (jemimah rodrigues) सुरुवातीच्या काळात हातात हॉकी स्टिक धरली होती. तिने 17 वर्षांखालील वयोगटात हॉकीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. जेमिमाचे पहिले प्रशिक्षक तिचे वडील इव्हान रॉड्रिग्ज होते. वडिलांनीच शाळेत महिला क्रिकेट संघ तयार केला, ज्यामध्ये जेमिमालाही स्थान मिळाले. जेमिमाच्या क्रिकेट करिअरची सुरुवात इथून झाली आणि तिने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी 22 यार्डांच्या खेळपट्टीवर धमाकेदार कामगिरी करून थेट टीम इंडियात प्रवेश केला.
आपल्या छोट्या क्रिकेट कारकिर्दीत जेमिमाने (jemimah rodrigues) पॉवर हिटर म्हणून आपला ठसा उमटवला असून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जेमिमा फलंदाजीसोबतच फिरकी गोलंदाजीही करते. स्मृती मानधना नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये अंडर-19 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी जेमिमा ही दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने 2017 मध्ये सौराष्ट्राविरुद्ध ही धडाकेबाज खेळी खेळून 63 चेंडूत 202 धावा फटकावल्या होत्या.
22 वर्षीय जेमिमा 76 टी-20 सामन्यांच्या 66 डावांमध्ये 13 वेळा नाबाद राहिली असून 30.71 च्या सरासरीने 1628 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने 10 अर्धशतके फटकावली आहेत. 76 ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 3 अर्धशतकांच्या मदतीने 19.70 च्या सरासरीने 394 धावा केल्या आहेत.