Latest

WPL 2024 : वुमन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या लिलावात लागली होती ‘या’ पाच खेळाडूंवर मोठी बोली

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : वुमन्स प्रीमियर लीग 2024 साठी खेळाडूंचा लिलाव आज (दि.9) होणार आहे. महिला प्रीमियर लीग स्पर्धेत जगभरातील अनेक महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. या वुमन्स प्रिमियर लीगची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती. यंदा स्पर्धेच्या दुसऱ्या लिलावासाठी या दिग्गज महिला खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांमध्ये रस्सीखेच आपल्या पहायला मिळणार आहे. या निमित्ताने मागील लिलावात महागड्या पाच खेळाडूंविषयी जाणून घेवूयात… (WPL 2024)

1. स्मृती मानधना

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मानधनाला मागील लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 3.4 कोटी रूपयांमध्ये विकत घेतले होते. मानधनाला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा लागली होती. मात्र, आरसीबीने बोली वाढवत स्मृतीला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. मात्र, गेल्या मोसमात आरसीबीची कामगिरी काही विशेष झाली नाही. (WPL 2024)

2. ऍशले गार्डनर

ऍशले गार्डनर ही ऑस्ट्रेलियन खेळाडू जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. गुजरात जायंट्सने ऍशले गार्डनरला आपल्या बॅटिंग लाइनअपमध्ये अनुभवी खेळाडू म्हणून घेतले होते. ती सामन्याच्या गरजेनुसार खेळण्यात पारंगत आहे. गार्डनरची खास गोष्ट म्हणजे ती कधीही कोणत्याही गोलंदाजाला चौकार आणि षटकार ठोकू शकते. गुजरातप्रमाणेच इतर फ्रँचायझीदेखील गार्डनरला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी उत्सुक होत्या. मागील लिलावात तिच्यावर 3.2 कोटींची बोली लागली होती.

3. नेट सीवर-ब्रंट

इंग्लंडच्या नेट सीवर-ब्रंट या अष्टपैलू खेळाडूच्या क्षमतेवर कोणालाही शंका नाही. मुंबईला मधल्या फळीत झंझावाती फलंदाजीबरोबरच गोलंदाजीचा उत्तम पर्याय हवा होता. म्हणून त्यांनी नेट सीवर-ब्रंट त्यांनी आपल्या संघात सामील करून घेतले होते. तिला मुंबईने 3.2 कोटी रूपयांत खरेदी केले होते.

4. शेफाली वर्मा

भारताची सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून शेफाली वर्मा प्रसिद्ध आहे. तिला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. दिल्लीने तिला 2.6 कोटी रुपयांना विकत घेतले होते. शेफालीने गेल्या मोसमातही अनेक आक्रमक खेळी खेळल्याय तिच्या या खेळीमुळे दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती.

5. जेमिमा रॉड्रिग्ज

शेफालीशिवाय दिल्लीला मधल्या फळीत भरवशाच्या फलंदाजाची गरज होती. जेमिमा सध्या भारतीय मधल्या फळीतील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. यासोबत ती चपळ क्षेत्ररक्षक देखील आहे. दिल्ली कॅपिटल्सने तिच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी 2.2 कोटी रुपये खर्च केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT