Latest

Bamboo Crash Barrier : महामार्गावर बांबूचे क्रॅश बॅरिअर; जगातील पहिला प्रयोग विदर्भात

अमृता चौगुले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात येणार्‍या धातूच्या कठड्यांऐवजी बांबूचे क्रॅश बॅरिअर लावण्याचा जगातील पहिला प्रयोग विदर्भात करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Bamboo Crash Barrier)

गडकरी यांनी एक ट्विट करीत या बांबू क्रॅश बॅरिअरची छायाचित्रासह माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'आत्मनिर्भर भारत' होण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकत जगातील पहिले पूर्णपणे बांबूपासून बनवलेले क्रॅश बॅरिअर विकसित करण्यात आले आहे. (Bamboo Crash Barrier)

कठोर चाचण्यांत उत्तीर्ण (Bamboo Crash Barrier)

200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे नाव 'बाहुबली' ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय वाहन चाचणी ट्रॅकसह पिथमपूर, इंदूर आणि इतर काही ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. रूरकीच्या केंद्रीय इमारत संशोधन संस्थेत याची अग्निरोधक चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांनंतर भारतीय रोड काँग्रेसने याला मान्यता दिली आहे.

विशिष्ट जातीच्या बांबूचा वापर

या क्रॅश बॅरिअरच्या निर्मितीसाठी 'बँबूसा बॅल्को' या जातीचा बांबू वापरण्यात आला असून, क्रिओसो ऑईल आणि घन रूपातील पॉली इथेलिन यांचा वापर मजबुती वाढवण्यासाठी करण्यात आला आहे. पोलाद आणि इतर धातूंना पर्याय म्हणून हे बॅरिअर विकसित करण्यात आले असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT