Latest

चांद्रयान-३ च्या यशाबद्दल BRICS परिषदेत पीएम मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर ब्रिक्स परिषदेत (BRICS) जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. बुधवारी जोहान्सबर्गमधील ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यानच्या डिनर पार्टीमध्ये फक्त चांद्रयान ३ च्या यशाचीची चर्चा सुरू होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. जोहान्सबर्ग येथे १५ वी ब्रिक्स परिषद सुरू आहे. बुधवारी परिषदेदरम्यान एका मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. चांद्रयान ३ च्या यशामुळे या डिनर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे आकर्षणाचे केंद्र ठरले. भारताच्या या यशाबद्दल जगभरातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. अनेक नेते मोदींना भेटून मिशनच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना दिसत होते. यामध्ये बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही सहभाग होता. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही "चांद्रयान चंद्रावर यशस्वी उतरल्याबद्दल भारताचे अभिनंदन" असे म्हटले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की ही कामगिरी संपूर्ण मानवजातीसाठी एक उपलब्धी म्हणून स्वीकारली जात आहे. सर्व भारतीयांच्या आणि वैज्ञानिकांच्या वतीने मी जगभरातील वैज्ञानिकांचेही आभार मानतो आणि या ऐतिहासिक क्षणाच्या शुभेच्छा देतो."

भारताने इतिहास रचला

भारतीय अंतराळ संस्था इस्रोची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली आहे. मिशनचे लँडर विक्रम बुधवारी यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. रोव्हर प्रज्ञान देखील लँडर विक्रममधून यशस्वीपणे बाहेर काढले आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT