Latest

जग मंदीच्या विळख्यात! पण भारत, चीनचा जागतिक विकासात निम्मा वाटा असेल : IMF

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदीचे सावट असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशादायी वक्तव्य केले आहे. २०२३ मध्ये भारत आणि चीनचा विकासदर जगाच्या निम्मा असेल. या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था ३ टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे.

"उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा काही प्रमाणात वेग वाढला आहे. विशेषत: आशियातून हे चित्र दिसत आहे. २०२३ मध्ये भारत आणि चीनचा जागतिक विकासातील वाटा निम्मा असेल. पण इतर देशांना तीव्र संकटाचा सामना करावा लागेल," असे जॉर्जिव्हा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

गेल्या वर्षी कोविड-१९ साथीच्या आजारामुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली तीव्र मंदी या वर्षीही कायम राहू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे २०२२ मध्ये जागतिक विकास दर ६.१ टक्क्यांवरून ३.४ टक्क्यांपर्यंत जवळपास निम्म्याने घसरला, असेही जॉर्जिव्हा यांनी पुढे म्हटले आहे.

पण हा अर्थव्यवस्थेच्या संथ वाढीचा टप्पा किती काळ चालणार आहे? यावर बोलताना IMF च्या जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेच्या संथगतीचा कालावधी लांबत जाईल. यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये विकासदर वाढीचा दर ३ टक्क्यांपेक्षा खाली येऊ शकते. IMF प्रमुखांच्या मते, "१९९० नंतरचा सर्वात कमी मध्यम-मुदतीचा विकास वाढीचा अंदाज आहे आणि गेल्या दोन दशकांतील सरासरी ३.८ टक्क्यांपेक्षा तो कमी आहे."

त्या पुढे म्हणाल्या की अर्थव्यवस्थेची मंद वाढ ही कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी अधिक आव्हानात्मक असेल. "आर्थिक स्थितीमुळे गरिबी आणि उपासमारीत वाढ होऊ शकते. ही एक धोकादायक स्थिती जी कोविड संकटामुळे सुरू झाली होती." २०२३ मध्ये सुमारे ९० टक्के प्रगत अर्थव्यवस्थांचा विकास दर घसरण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

बँकिंग क्षेत्रातील संकटाबद्दल बोलताना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, २००८ च्या संकटापासून जागतिक बँकिंग प्रणालीने एक लांब पल्ला गाठला आहे. फक्त बँकांमध्येच नव्हे तर गैर-बँकांमध्येदेखील असुरक्षेची चिंता कायम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT