Latest

World Alzheimer’s Day : ज्येष्ठांमध्ये स्मृतिभ्रंशाचे वाढते प्रमाण चिंताजनक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठांमध्ये अल्झायमर अर्थात स्मृतिभ्रंशाचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. साधारण 65 वर्षांवरील 10 टक्के, 75 वरील 25 टक्के आणि 85 वरील 50 टक्के ज्येष्ठांना हा आजार होतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार अल्झायमरला कारणीभूत असणार्‍या मेंदूतील पेशी नेमक्या का नष्ट होतात, याचे कारण समोर आले आहे. त्यामुळे अल्झायमरवर कायमस्वरूपी उपाययोजना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.  ज्येष्ठ नागरिकांची अल्झायमरमुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होते. मात्र, अल्झायमरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढत जाऊ शकतो.

दैनंदिन आयुष्यात विसराळूपणामुळे अनेक अडचणी निर्माण होतात आणि आयुष्याच्या संध्याकाळी समस्यांचा सामना करावा लागतो. जीवनशैलीतील बदल, औषधोपचार, वर्तणूक थेरपी आणि समुपदेशन यामुळे ज्येष्ठांना काहीसा दिलासा मिळू शकतो. जागृती पुनर्वसन केंद्राचे मुख्य मनोविकारतज्ज्ञ डॉ. अमर शिंदे म्हणाले, 'अल्झायमर झालेल्या व्यक्तींचा खूप गोंधळ उडतो. त्यांना वेळ, काळ, दिवस, व्यक्ती समजत नाही. शक्यतो हा गोंधळ रात्री खूप वाढतो. याला 'सन डाऊनिंग' म्हणतात.

बरेचदा रुग्णांच्या मनात संशय किंवा असुरक्षितता निर्माण होते. झोप न येणे, जेवण न करणे, वजन कमी होणे, राग येणे, हिंसा अशी लक्षणेही दिसतात. प्रत्येक स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमर नव्हे. यामध्ये विविध प्रकार आहेत. डिमेंशियापैकी 75% लोकांना अल्झायमर होतो. याचे कारण मेंदूच्या पेशीमध्ये अ‍ॅमिलॉईड नावाचा पदार्थ तयार होतो. त्यामुळे त्या पेशी मृत होतात आणि समरणशक्तीवर परिणाम होतो. अल्झायमर या आजारावर काही औषधे आहेत. त्यामुळे आजाराची वाढ कमी होते किंवा थांबते. त्यामुळे निदान लवकर होणे गरजेचे आहे.

उपाययोजना काय?

काही स्मृतिभ्रंश अनुवंशिक असतात, तर काही वागण्यातल्या सवयीमुळे होतात. लवकर निदान केल्यास उपाययोजना करता येतात. लवकर औषधे सुरू केल्यास आयुष्याची गुणवत्ता वाढू शकते. आजारामध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र असे तीन टप्पे असतात. सौम्य आजारामध्ये रुग्ण आयुष्याचे निर्णय इतर लोकांप्रमाणे घेऊ शकतात. त्यामुळे लवकर निदान झाले तर प्लॅनिंग व्यवस्थित करता येते.

कुटुंबीयांनी समजूतदारपणा दाखवून रुग्णाला स्वीकारल्यास आणि दैनंदिन आयुष्यात मदत केल्यास त्यांचे जीवन सुखकर होऊ शकते. रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह इत्यादी आजारांची चाचणी आणि उपचार व्यवस्थित करणे गरजेचे आहे.

– डॉ अमर शिंदे, मुख्य मनोविकारतज्ज्ञ,
जागृती पुनर्वसन केंद्र, पुणे व मुंबई

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT