Latest

अमरावती : मुलाच्या वाढदिवसाला पती न आल्‍याने पीएसआयच्या पत्‍नीची आत्‍महत्‍या

निलेश पोतदार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा वरुड तालुक्यातील बेनोडा (शहिद) पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांच्या ३२ वर्षीय पत्नीने आपल्‍या भाड्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ६ वाजता उघडकीस आली. पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशीमला होते. गुरवारी त्यांच्या ८ वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. केक कापून वाढदिवस साजरा झाला. मात्र पती मुलाच्या वाढदिवसाला आले नसल्‍याच्या कारणातून पत्‍नीने राहत्‍या घरी गळफास घेत आत्‍महत्‍या केली.

मुलाच्या वाढदिवसाला पती यावेत यासाठी पत्नीने पहाटेपर्यंत पतीला मोबाईलवर गळ घातली. ते न आल्‍याने अखेर मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीने भाड्याने राहत असलेल्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेतला. यावेळी दुपारी वरुडला पोहचलेल्या नातेवाईकांनी मुलीचे पार्थिव पाहून एकाच टाहो फोडला. मृताचे नाव गंगा गणपत पुपुलवार (३२) ह.मु. साईसंगम कॉलनी वरुड असे आहे.

पती गणपत पुपुलवार हे बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून, ते दोन दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता वाशिमला गेले होते. ते साईसंगम कॉलनीतील हुरडे यांच्या घरी तीन ते चार वर्षांपासून भाड्याने राहत आहेत. गणपत पुपुलवार हे प्रशिक्षणासाठी गेल्‍यावर पत्‍नी गंगा पुपुलवार (८ वर्षीय) गौरव आणि (४ वर्षीय) गौरी ही मुले असे तिघेच घरी होते. गुरुवारी मुलगा गौरवाचा वाढदिवस असल्याने केक आणून रात्री साडेआठ वाजता वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसाला व्हिडीओ कॉल करून पतीसह माहेरच्या नातेवाईकांना दाखविले. परंतु पती गणपत यांनी मुलाच्या वाढदिवसाला यावे अशी सतत पत्नीने गळ घातली. परंतु प्रशिक्षण सोडून येणे शक्य नव्हते. पहाटे पर्यंत व्हिडीओ कॉल करून बोलत राहिले. मात्र प्रशिक्षण सुरु झाल्याने पतीने मोबाईल बंद केला. यावेळी मुलगा आणि मुलगी जागीच होती.

यावेळी मुलांच्या नजरेसमोरच पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे सांगण्यात येते. मुलांनी आरडाओरड केली. शेजारच्या नागरिकांनी घरात येउन पाहिले असता, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेमुळे साईसंगम कॉलनीत खळबळ उडाली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, वरुड ठाणेदार प्रदीप चौगावकरसह पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता ठेवला असून, नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्‍यांचे माहेर नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील असल्याने उशिरा पोहचलेल्या आई-वाडिलांनी पोटचा गोळा गेल्याचे पाहून एकच हंबरडा फोडला. यावेळी सासर माहेरच्या नातेवाईकांमध्ये संताप सुद्धा व्यक्त झाला. अखेर वरुड ठाणेदार प्रदीप चौगावकर , बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटेसह वरुड बेनोडा पोलिसांनी परिस्थिती हाताळून नातेवाईकांची समजूत घालून शवविच्छेदन करण्यात आले.

पार्थिव उपनिरीक्षक पपुलवार यांचे मूळगावी जिरोना ता . भोकर जि .नांदेड येथे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. पुढील तपास एपीआय सारिका बागडे करीत आहेत. नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

SCROLL FOR NEXT