पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतातील राज्यांमध्ये मागील पाच दिवस अतिवृष्टीने हाहाकार माजला आहे. जिवितहानीसह पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. या निसर्गाच्या प्रकोपामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून आता मदतकार्य वेळेत पोहचले नसल्याने नागरिकांकडून सरकारविरोधात संतापही व्यक्त होत आहे. हरियाणाच्या घुला येथील परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या जेजेपी आमदाराला संतप्त महिलने थेट कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ( Woman slaps MLA )
जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) हा हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. या पक्षाचे आमदार ईश्वर सिंह हे पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी घुला येथे गेले होते. ते परिस्थितीचा आढावा घेत होते. परिसरातील पूरस्थितीमुळे जनजीवनच विस्कळीत झाल्याने महिला त्रस्त झाली होती. सगळं घडून गेले, आता कशासाठी आला आहात, असा सवाल करत तिने थेट ईश्वरसिंह यांच्या कानशिलात लगावली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार ईश्वर सिंह हे जमावामध्ये उभा असल्याचे दिसते. यावेळी संतप्त झालेली महिला थेट त्यांना कानशिलात लगावताना दिसते.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना, आमदार ईश्वर सिंह म्हणाले की, मी गावातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. यावेळी मी संबंधित महिलेची समजूत काढली. ही एक नैसर्गिक आपत्ती होती, असे तिला सांगितले. संबधित महिलेला मी तिच्या तिच्या कृत्याबद्दल माफ केले आहे. तिच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. मी तिला माफ केले आहे, असेही आमदार ईश्वर सिंह यांनी स्पष्ट केले.
पंजाब आणि हरियाणातील अनेक गावे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानंतर ओसंडून वाहणाऱ्या घग्गर नदीमुळे बाधित झाल्यामुळे मदतकार्य सुरू आहे.
हेही वाचा :