Latest

सुनील केदारांच्या आमदारकीवर टांगती तलवार

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्‍तसेवा : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक रोखे घोटाळ्यात दोषी आढळल्याने ५ वर्षाची कारावासाची शिक्षा झालेले व सध्या मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात आली आहे. काल शुक्रवारी जेएमएफसी न्यायालयाने त्यांना या घोटाळ्यात पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे केदार यांच्यापुढे राजकीय संकट निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी राज्य विधिमंडळा संदर्भात माहिती दिली असून तीन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा असल्याने त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात जामीन घ्यावा लागणार आहे.

सुमारे १५२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात न्यायालयाने त्यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. केदार यांना झालेल्या शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. अर्थात यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. आता नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केदार यांच्या वकिलांनी आवश्यक कागदपत्रे सादर करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागण्याची तयारी सुरु केली आहे. न्यायालयात शिक्षेला स्थगिती तसेच आव्हान देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु असले तरी तीन दिवस सलग सुट्टी आहे.

दरम्यान, काल रात्री केदार यांना कारागृहात नेण्यात आल्यानंतर वैद्यकीय तपासणीत रक्तदाब, डोकेदुखी व छातीत दुखत असल्याच्या त्यांच्या तक्रारीच्या आधारे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला व रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, सावनेर मतदारसंघात केदार यांचे भाजपकडून प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले माजी अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, दुसरे दावेदार माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी पत्रकारपरिषद घेत उशिरा का होईना न्यायालयात न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया देत या निर्णयाचे स्वागत केले. आमदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटणार असून त्यांना निवेदन देणार आहे.

यावेळी जनहित याचिकाकर्ते ओमप्रकाश कामडी, माजी जिप अध्यक्ष संध्या गोतमारे उपस्थित होते. हा केवळ नागपूरपुरता घोटाळा अवलंबून नसून राज्यातील डबघाईस आलेल्या विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांशी संबंध असल्याने कर्ज मिळत नाही म्हणून सावकारांकडे जावे लागले. अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले, याकडे लक्ष वेधताना या आर्थिक संकटात असलेल्या बँकांचे पुरुज्जीवन करण्याची मागणी यानिमित्ताने आशीष देशमुख यांनी केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT