Latest

युवासेनेच्या अध्यक्षपदी श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार, शिंदे समर्थकांचे पोस्टर व्हायरल

अविनाश सुतार

नेवाळी (ठाणे): पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून लक्ष केलं जातं आहे. मात्र, शिंदे यांनी पक्षावर दावा ठोकत प्रवक्ते, नेतेपदावर नियुक्त्या केल्या आहेत. यानंतर आता त्यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करत आहेत. त्यामुळे आता युवासेनेच्या अध्यक्षपदाची धुरा श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देत पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा घेत त्यांनी थेट गुवाहाटी गाठली होती. यानंतर त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून भाजपसोबत जवळीक सांधून मुख्यमंत्रीपद मिळवले. सध्या एका बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करत आहेत. तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे राज्यभरात दौरे करत आहेत. त्यामुळे खासदार शिंदे यांच्या खांद्यावर शिंदे गटाने युवासेना अध्यक्षपदाची धुरा द्यावी, असे शिंदे समर्थकांचे पोस्टर व्हायरल होऊ लागले आहे.

दरम्यान, सध्या राज्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दौरे करत आहेत. ते शिंदे गटाच्या आमदारावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी शिंदे गट युवासेनेवर देखील दावा ठोकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आता शिंदे गटाच्या प्रवक्ते, नेतेपदी निवडी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर युवा सेना अध्यक्षपदाची धुरा देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT