सण-उत्सव साजरे करताना मोकळीकीचा समतोल सांभाळावा | पुढारी

सण-उत्सव साजरे करताना मोकळीकीचा समतोल सांभाळावा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘यंदा सर्व सार्वजनिक महोत्सवांना थोडी मोकळीक देण्यात आली आहे. परंतु, सणवार साजरे करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीचा समतोल ढळतो आहे की काय असे वाटते आहे. नागरिकांनी दिलेल्या मोकळीकीचा असमतोल होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा हा असमतोल वाढल्यास समतोल सांभाळण्यासाठी पुन्हा बंधने आणणे क्रमप्राप्त ठरू शकते,’ असे मत उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आम्ही कोथरूडकर आयोजित आणि संवाद पुणे निर्मित कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. गायक पं. आनंद भाटे, सुनील महाजन, मंदार जोशी, सचिन ईटकर, राजेश पांडे, मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी पुरेसा खर्च केला पाहिजे. राज्याराज्यात, शहराशहरात कलाकारांच्या कलेचे आदान-प्रदान वाढवून कलाकारांची खाण वृद्धिंगत करायला पाहिजे.’

शिल्पा दातार आणि सहकार्‍यांनी गणेश वंदना सादर केली. तर श्रृंगाली परांजपे आणि सहकार्‍यांनी गीत सादर केले. अभिनेत्री डॉ. तेजा देवकर आणि वैशाली जाधव यांची कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी रसिकांची दाद घेऊन गेली. यानंतर नाट्यरंग या कार्यक्रमात पं. आनंद भाटे यांचे नाट्यसंगीत आणि अभंग ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली.

Back to top button