Latest

IFFI Goa 2023 …मग चांगल्या गोष्टी चित्रपटांमधून का घेत नाहीत ? : विद्या बालन यांचा सवाल

अविनाश सुतार


पणजी : समाजाला संदेश देणे, हे आमचे काम नाही. ते राजकीय नेत्यांचे काम आहे. आम्ही मनोरंजन क्षेत्रात काम करतो, लोकांचे मनोरंजन करतो. समाजात वाईट गोष्टी केवळ चित्रपटांकडून घेतल्या जातात, हा आरोपच चुकीचा आहे. जर चुकीच्या गोष्टी चित्रपटांमधून घेतल्या जात असतील, तर चांगल्या गोष्टी का घेतल्या जात नाहीत, असा प्रश्न करीत मनोरंजन करताना आम्ही तुम्हाला एखाद्या विषयावर विचार करायला लावला, तर तो आमचा विजय आहे, असे रोखठोक प्रतिपादन 'सिल्क'फेम अभिनेत्री विद्या बालन यांनी केले.
54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्ग आयोजित करण्यात आलेल्या स्नेस संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सूत्रसंचालन तन्वी त्रिपाठी यांनी केले. IFFI Goa 2023

विद्या बालन यांनी आपल्या आयुष्यातील अनेक कंगोरे यावेळी उलगडले. त्या म्हणाल्या, पंधरा वर्षांपूर्वी मी इफ्फीला आले होते. त्यानंतर शूटिंगच्या तारखांमुळे येणे शक्य झाले नाही. मात्र, यावर्षी तो योग आला, असे सांगतानच हम पाँच ही माझी पहिली मालिका असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, त्यापूर्वी आपण एका मालिकेत काम केले होते. मात्र, शूटिंगचे ठिकाण लांब असल्याने मी त्या मालिकेचे केवळ चार भाग पूर्ण केले. त्यानंतर मिळालेल्या हम पाँच मालिकेने ओळख दिली. भविष्यात अनेक चित्रपट केले. परंतु, ते एका ठराविक चौकटीतले होते. डर्टी पिक्चरमुळे मी चौकट मोडून बाहेर पडले. अभिनेत्रीलाही तिचे स्वत:चे भावविश्व असते. तिला थोडी मोकळीक दिल्यास ती इतिहास घडवू शकते, हा विश्वास मला या चित्रपटाने दिला. माझी स्वत:ची ओळख बनविण्याची संधी मला या चित्रपटाने दिली. अर्थात त्याचे सारे श्रेय एकता कपूर आणि सर्व टीमला द्यावे लागेल. कारण त्यांनी सिल्कची भूमिका करून घेतली. डर्टी पिक्चर हा बायोपिक असला तरी तो मी जगले. त्यामुळे हा पिक्चर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. IFFI Goa 2023

डर्टी पिक्चर चित्रपटाने अनेक गोष्टींमध्ये पारंपरिक चौकट मोडण्याचे काम केले आहे. चित्रपटात सिगारेट ओढण्याचे प्रसंग साकारायचे होते. एक महिला पडद्यावर सिगारेट ओढते, हा परंपरेला छेद देणारा विषय होता. आम्ही तीही चौकट मोडून कथानकाला हवे, ते कोणतेही दडपण न ठेवता सादर करीत गेलो आणि दुसरीकडे आम्ही पारंपरिक चित्रपटाची चौकट मोडून मुक्त हस्ते चित्रपट साकारला. तुम्हाला तुमची ओळख बनवायची असेल, तर तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची गरज आहे. नंतरच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये विभिन्न भूमिका साकारल्या. त्याही प्रेक्षकांनी स्वीकारल्या, असेही त्या म्हणाल्या.

एखादी महिला जाड असेल, तर तिला वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे सल्ले दिले जातात. मात्र, ते मनावर घेऊ नका. तुमच्या मनाला काय वाटतं त्याचा विचार करा. प्रेक्षक तुमच्या शरीरावर नाही, तर कलेवर प्रेम करतात. त्यामुळे तुमचे मन काय सांगते, त्याचाच विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला.

IFFI Goa 2023 : चित्रपट आणि सत्य…

चित्रपटात दाखविलेली दृश्य किंवा प्रसंग प्रेक्षकांना खरे वाटतात. परंतु, तसे नसते. मिशन मंगल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण इस्त्रोसंदर्भात माहिती विचारण्यासाठी आपल्याकडे येत असतं. तसेच एका चित्रपटात सिंहासोबत काही दृश्य आहेत. परंतु, मी एकदाही सिंहासमोर गेले नसल्याचे विद्या बालन यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT