Latest

Ayush Badoni : आयपीएलच्या पदार्पणातच मैदान गाजवणारा ‘हा’ २२ वर्षीय तरूण आहे तरी कोण?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : काल झालेल्या आयपीएल २०२२ हंगामातील चौथ्या सामन्यातून लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये पदार्पण केले. (IPL 2022) पदार्पणाच्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. यावेळी लखनौ संघाला गुजरातसमोर पराभव पत्करावा लागला. यंदाच्या आयपीएल हंगामात पदार्पण करणाऱ्या लखनौच्या २२ वर्षीय आयुष बदोनीने (Ayush Badoni)  आपल्या धडाकेबाज फलंदाजीने मैदान गाजवलं. त्याने सामन्यात नैसर्गिक खेळी करत ४१ चेंडूत ५४ धावा आपल्या खात्यात जमा केल्या. त्याचे हे आयपीएलमधील पहिले अर्धशतक आहे. ही खेळी करताना त्याने ३ षटकार आणि ४ चौकार लगावले. या अर्धशतकासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आयुष बदोनी आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. मात्र, आयपीएल पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात विरोधी संघाचा घाम फोडणारा आयुष बदोनी नक्की आहे तरी कोण? हे जाणून घेऊया. (IPL 2022)

कोण आहे आयुष बदोनी?

गुजरात टायटन्सविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करत आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकणारा फलंदाज आयुष बदोनी (Ayush Badoni)  हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. आयुष हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो खालच्या फळीत उपयुक्त खेळी करण्यात पटाईत आहे. त्याने भारतीय संघाच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १८५ धावांची खेळी करत सर्वांची वाहवा मिळवली होती.

त्याने ४ दिवसीय सामन्यात ९.३ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत ४ गडीही आपल्या जाळ्यात खेचले. यादरम्यान त्याने २ निर्धाव षटके टाकली होती. बदोनीने २०१८ साली १९ वर्षांखालील आशिया चषकात आपल्या खेळीला साजेशी कामगिरी केली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना २८ चेंडूत ५२ धावांची खेळी केली होती. जानेवारी २०२१ मध्ये त्याने टी२० पदार्पण केले होते. तसेच, आयुष देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून ५ सामने खेळला आहे.

लखनौ संघाने बेस प्राईसवर केले ताफ्यात सामील

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव खूपच महत्त्वाचा होता. कारण, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हंगामात १० संघ खेळणार होते. अशात प्रत्येक संघाने लिलावात सर्वाधिक बोली लावत चांगले अनुभवी खेळाडू आपल्या संघात समाविष्ट केले. त्यात लखनौ संघाने देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या बदोनीला २० लाखांच्या मूळ किंमतीत विकत घेतले होते.

SCROLL FOR NEXT