भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता देण्यात आल्याचे समजते आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विटकरून माहिती दिली आहे. दरम्यान कोव्हॅक्सिन लसीचा आता या यादीत समावेश झाल्यानं जगातील सर्व देशांना कोव्हॅक्सिन लस वापरता येणार आहे. तसेच कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या नागरिकांना जगभरातील देशांमध्ये येण्या-जाण्यावरील निर्बंध हटवण्यात येऊ शकतात.
दरम्यान, 'कोव्हॅक्सिन' या भारतीय बनावटीच्या कोरोना लसीच्या वापरास ऑस्ट्रेलियाने सोमवारी मंजुरी दिली. प्रवाशांचे लसीकरण झाल्याचे निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियात कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने स्पष्ट केले.
कोव्हॅक्सिनला गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आज जागतिक आरोग्य संघटनेने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. डब्ल्यूएचओच्या तांत्रिक समितीने आज भारत कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी असलेल्या लसीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचे वृत्त आहे.
पीटीआयच्या ट्विटनुसार, 'जागतीक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटानं भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालिन वापराच्या यादीत समाविष्ट केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे'
दरम्यान यापूर्वी कमिटीने दोनदा कोव्हॅक्सिन उत्पादित करणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. मागील आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनाचे तांत्रिक सल्लागार समितीने भारतातील स्वदेशी लस कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी यादीत टाकण्यासाठी अतिरिक्त माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे ही महत्त्वपूर्ण बैठक झाली.
कोव्हॅक्सिन ही लस हैदराबाद येथील भारत बायोटेकने विकसित आणि उत्पादित केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड या दोन लशींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कोव्हिशिल्डला ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.