Latest

Pregnancy Diet : कसा असावा गर्भारपणातील आहार-विहार?

अनुराधा कोरवी

गर्भारपण हा स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ असतो. गर्भारपणाच्या काळात स्त्रियांच्या आहार-विहाराचा, दिनक्रमाचा, मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा चांगला अथवा वाईट परिणाम जन्माला येणार्‍या बाळाच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळेच या काळात गर्भिणींनी आरोग्याबाबत दक्ष राहणे आणि आपला दिनक्रम आरोग्यदायी राखणे आवश्यक असते. ( Pregnancy Diet ) 

संबंधित बातम्या 

गर्भिणी असणार्‍या स्त्रियांना गर्भारपणात स्वतःची आणि आपल्या होणार्‍या बाळाची अशी दुहेरी काळजी घ्यावी लागते. ही काळजी नीट घेणे हे त्या बाळाच्या जन्मानंतरच्या भावी आरोग्यासाठीही अत्यावश्यक असते. अर्थात, हे सगळे या गर्भिणीच्या दिनक्रमावर अवलंबून असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. काही प्रमाणात या दिनक्रमाला आवश्यक तेथे प्रतिबंधक उपायांची जोड देणेही उपयुक्त ठरते.

अगदी सकाळी उठल्यापासूनच हा दिनक्रम नियमित ठेवावा लागतो. सकाळी उठल्या उठल्या पोट साफ झाले पाहिजे. तसे न झाल्यास कुणालाही त्याचा त्रास होतोच, पण या मलावरोधाचा त्रास गर्भिणींना अधिक होतो; कारण गर्भारपणात तीव्र विरेचकही देता येत नाही. अनेकवेळा गर्भिणी स्त्रीमध्ये या त्रासामुळे पुढे बाळंतपणात मूळव्याधीचा त्रास होताना आढळतो. तो होऊ नये म्हणून मलावरोधाची तक्रार सुरू झाल्यानंतर लगेच त्यावर योग्य ती उपाययोजना करवून घेणे उपयुक्तठरते.

त्रिफळा चूर्ण, गंधर्वहरितकी चूर्ण, सुखसारख चूर्ण यांसारखी सौम्य विरेचक मिश्रणे वैद्यांच्या सल्ल्याने योग्य त्या प्रमाणात, योग्य अनुपानातून घेतल्यास मलावरोध दूर होण्यास मदत होते. गायीचे दूध आणि गायीचे तूप हे मिश्रणही रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास पोटातील मळ मऊ होऊन नीटपणे बाहेर पडायला मदत होऊन मलावरोधाचा त्रास कमी होऊ शकतो.

एरवीदेखील गायीचे दूध आणि गायीचे तूप या दोन्ही गोष्टी गर्भिणीला अत्यंत हिताच्या ठरतात. नव्हे, त्या आवश्यकच आहेत. यामुळे गर्भिणीच्या रसरक्तादी धातूंना बल मिळते. तसेच बाळाची वाढही उत्तम होते.

गायीचे दूध, तूप हे उत्तम बुद्धिर्धन करणारे असल्याने बाळाला मातेच्या गर्भात असल्यापासूनच 'बौद्धिक' खाद्य मिळते. गर्भिणीने आपल्या आहाराकडे सर्व नऊ महिने अतिशय लक्ष द्यायला हवे. 'डोहाळे' पुरवण्यासाठी 'डोहाळजेवण' देण्याची प्रथा गर्भिणीचे आणि बाळाचे योग्य पोषण होण्याच्या द़ृष्टीनेच पडली असावी. अशा प्रथा या केवळ अंधपणे न पाळता यामागचा शास्त्रीय, आरोग्यदायी द़ृष्टिकोनही आपण लक्षात घ्यायला हवा.

गर्भिणी घेत असलेल्या आहाराचा सुपरिणाम आणि दुष्परिणाम तिच्या गर्भावरसुद्धा होत असतो. त्यामुळे पचायला खूप जड असणारे आहारीय पदार्थ गर्भिणी स्त्रियांनी जास्त प्रमाणात घेऊ नयेत. तसेच अतिउष्ण गुणाच्या गोष्टी पोटात घेऊ नयेत. लोणचे, दही, तिखट पदार्थ, पपई हे सर्व शक्यतो टाळावेत. अतिखारट पदार्थही टाळणे चांगले. उडदाचे पापडही वर्ज्य करावेत. तसेच केळी, अन्य फळे आणि दूध यांचे मिश्रण टाळावेच.

हल्ली 'फॅड' असणारे फास्ट फूड हे तर गर्भिणींसाठी खूपच घातक ठरू शकतात. त्यामुळे पुढे बाळाला मांसधातूचे विकार होण्याची शक्यता बळावते. ही गोष्ट स्त्रियांच्या लक्षातही येत नाही; पण पुढे बाळाला असा त्रास झाल्यावर गर्भारपणातील आईच्या आहाराचा इतिहास बघितल्यावर याची खात्री पटते. फास्ट फूडप्रमाणेच आईस्क्रीम, अतिशीतपेये हीदेखील गर्भिणी स्त्रियांनी टाळायला हवीत. उसळी, ब्रेड, बटाटे असे वातूळ पदार्थही शक्यतो टाळावेत.

एवढे सगळे नकारार्थी वाचल्यावर गर्भिणीने नेमके खावे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. गर्भारपणी दूध, तूप, वरण-भात, गव्हाचे हलके फुलके, पचायला सुलभ अशा विविध भाज्या, उष्ण नसणारी फळे असा विविधांगी आहार घेणे आरोग्यदायी ठरते. गायीच्या दुधातून शतावरी, अश्वगंधा, विदारीकंद अशी काही वनस्पतीजन्य औषधे योग्य सल्ल्याने घेता येतात. शतावरी कल्प हे तयार औषध केवळ दूध येण्यासाठी नव्हे, तर एकूणच रसधातू बलवान होण्यासाठी उपयोगी पडते. त्यामध्ये साखर आणि शतावरी असे मिश्रण असते. 'शर्करा कल्प' हा विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो.

गर्भाची उत्तम वाढ होण्यासाठी, त्याचे वजन नीट वाढवण्यासाठी, आयुर्वेदाने विविध मासानुमासिक काढे सांगितलेले आहेत. त्यांचा उपयोग खूप चांगला होतो. सुवर्णसिद्ध जल हेसुद्धा गर्भिणीने रोज घेतल्यास त्याचा उपयोग बाळाची एकूण वाढ, बुद्धी चांगली होण्यासाठी होतो. यामध्ये सोन्याची अंगठी, बांगडी पाण्यात उकळून ते पाणी गाळून दिवसभर थोडे-थोडे पिता येते. गर्भिणी स्त्रीने दररोज स्नानापूर्वी हलके अभ्यंग करावे. याने वातदोष नियंत्रणात राहतो.

'बस्ती'चाही उपक्रम गर्भिणी स्त्रीसाठी विशिष्ट काळात उपयोगी पडतो. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी त्याने मदत होते. गर्भिणीने आपला आहार-विहार वातप्रकोपक असणार नाही, याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. सतत वाहनावरून प्रवास करणे हेदेखील चांगले नाही. यामुळे गर्भाला त्रास होऊ शकतो. गर्भ नीट स्थिर राहून त्याचे उत्तम पोषण होणे, या काळात गरजेचे असते. त्या द़ृष्टीने आहार हा ताजा, षड्रसयुक्त असावा. नीट विश्रांती घेणे हेही तितकेच महत्त्वाचे. ( Pregnancy Diet ) 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT