Latest

kolar gold fields : केजीएफच्या खाणीची कथा आहे तरी काय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

KGF : Chapter-१ च्या प्रचंड यशानंतर त्याच्या सीक्वेलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण ज्या सोन्याच्या खाणीत कामगारांचे शोषण होते, त्या कथेवर सिनेमा पाहणाऱ्यांना वेड लावले होते. आता KGF: Chapter २ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. तुम्हाला माहितीये का, केजीएफची कथा काही प्रमाणात वास्तविक आहे. हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे. खरी कथा मात्र चित्रपटापेक्षा वेगळी आहे. KGF हा चित्रपट ज्या खाणीवर (kolar gold fields) आधारित आहे त्याचा इतिहास १०० वर्षांहून जुना आहे. गुप्त, चोल साम्राज्य, टीपू सुल्तान ते इंग्रजांपर्यंत अनेक वर्षे कोलारमधील सोने लुटले गेले, असे इतिहास सांगतो. (kolar gold fields)

KGF: Chapter 2 हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. यामध्ये साऊथस्टार य़शशिवाय अभिनेत्री श्रीनिधी, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडनदेखील आहेत.

केजीएफचा अर्थ आहे कोलार गोल्ड फील्ड. कोलार गोल्ड फील्ड हे कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील एक खाण क्षेत्र आहे. ब्रिटिश काळात सोन्यासाठी हे क्षेत्र खूप प्रसिध्द होते. कोलार जगातील सर्वात खोल खाण आहे. ही खाण जवळपास १२१ वर्षे खोदली जात होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलारमधून एकूण ९०० टनहून अधिक सोनं काढण्यात आलं होतं.

ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट जॉन वॉरनने KGF विषयी एक लेख लिहिला होता. त्यात असे म्हटले आहे की, खाणीचा इतिहास १७९९ मध्ये सुरु होतो, जेव्हा टिपू सुलतान श्रीरंगपट्टणाच्या युद्धात ब्रिटीशांकडून मारला गेला.

काही वर्षांनी ही जमीन म्हैसूर राज्याला देण्यात आली. पण कोलारच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा अधिकार इंग्रजांनी स्वतःकडे ठेवला.

कोलार खोदण्यासाठी आमिष दाखवले

लेफ्टनंट जॉन वॉरनच्या अहवालानुसार, चोल साम्राज्याच्या काळात लोक सोने काढण्यासाठी हाताने खाण खोदत असत. वॉरेन गावकऱ्यांना कोलार येथे सोन्यासाठी खोदण्याचे आमिष दाखवत असे. पण त्याला फार कमी सोने सापडले. नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट अनेक कामगारांना जीव गमवावा लागला. कंटाळलेल्या ब्रिटिश सरकारने उत्खनन थांबवले.

१८७१ मध्ये, लेव्हलीने वॉरनचा केजीएफ वरील लेख वाचला. त्यानंतर त्याने पुन्हा उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. १८७३ मध्ये लेव्हलीने म्हैसूरच्या महाराजांकडून उत्खनन करण्याची परवानगी मिळवली. त्यानुसार, १८७५ मध्ये पुन्हा खाणीचे उत्खनन सुरू झाले. खाणीमध्ये उजेडासाठी मशाल आणि कंदिलांचा वापर करण्यात आला. तेथे प्रकाश नसल्यामुळे लेव्हलीने विजेची व्यवस्था केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९०२ मध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ९५ टक्के सोन्याचे उत्खनन करण्यात आले. खाणीत ३० हजारहून अधिक कामगार काम करत होते. लेव्हलीचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाऊ लागले. अशा प्रकारे ब्रिटिशांनी अमाप सोने लुटले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT