Latest

व्लादीमीर पुतीन यांनी हाय ॲलर्टवर ठेवलेली न्यूक्लियर डिटरंट फोर्स आहे तरी काय ?

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे युक्रेनवर पाचव्या दिवशीही हल्ले सुरू असताना राशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशियन न्यूक्लियर डिटरंट फोर्सला (Nuclear deterrent force) सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या युद्धात रशिया आण्विक शस्त्रांचा वापर करणार का ? न्यूक्लियर डिटरंट फोर्स म्हणजे काय ? या फोर्सचे काय काम असते ? या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

न्यूक्लिअर डिटरंट फोर्सचे काय काम ?

न्यूक्लिअर डिटरंट फोर्स अण्वस्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करणारी आणि प्रतिहल्ला करणारी यंत्रणा असते. यामध्ये शीतयुद्धाच्या आधीच्या न्यूक्लिअर डिटरंट सिद्धांताची विचारधारा आहे. ज्यामध्ये कोणताही अण्वस्त्र हल्ला रोखण्यासाठी केला जातो.

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये संघर्ष वाढला होता. तेव्हा त्याला शीतयुद्ध असे म्हटले होते. त्यावेळी अमेरिकेने न्यूक्लिअर डिटरंट फोर्स (Nuclear deterrent force) रणनीती स्वीकारली होती. सोव्हिएत युनियन किंवा कोणत्याही देशाने अण्वस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर अमेरिका तातडीने त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आणखी मोठा हल्ला करेल, अशी ती रणनिती होती. युक्रेनच्या संघर्षात रशियाचे अध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) अमेरिकेची हीच रणनीती वापरण्याच्या तयारीत आहेत. जर अमेरिका किंवा नाटो सहयोगी देशांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेवर कठोर निर्बंध लावले किंवा युक्रेनला मदत करण्याचा प्रयत्न केला. तर रशिया अण्वस्त्रांने प्रत्युत्तर देण्याच्या पवित्र्यात असेल.

परंतु, अमेरिका किंवा नाटोमधील सहयोगी देश रशियाच्या विरोधात पहिल्यांदा आण्विक शस्त्र वापरण्याची शक्यता कमी आहे. त्यातच पुतीन यांनी पहिल्यांदाच सांगितले आहे की, कोणताही देश आमच्यामध्ये हस्तक्षेप करेल, त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. तर यापूर्वी रशियाने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि उत्तर कोरियाविरुद्ध अण्वस्त्रे वापरल्याचा इन्कार केला आहे.

युक्रेनकडे कोणतीही अण्वस्त्रे नाहीत. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या आण्विक वॉचडॉगने सर्व पक्षांना युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पांना धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच युक्रेनमध्ये एकूण १५ अणुभट्ट्यांसह चार अणुऊर्जा प्रकल्पातून देशाला जवळपास ५० टक्के वीजपुरवठा करतात, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Video :

SCROLL FOR NEXT