पुढारी ऑनलाईन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वीच भारतीयांच्या व्हिसासंदर्भातील अमेरिकेच्या संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर 'भारतीयांची व्हिसा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम्ही काय करत आहोत?' असा सवाल देखील तेथील एका खासदाराकडून अमेरिकेतील संसदेत विचारण्यात आला आहे.
यूएस सिनेट फॉरेन रिलेशन्स कमिटीचे अध्यक्ष सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि इंडिया कॉकसचे उपाध्यक्ष मायकेल वॉल्ट्ज यांनी भारतीयांना यूएस व्हिसा मिळण्यात होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी संसदेत बोलताना मेनेंडेझ म्हणाले की, 'अमेरिकन लोकांचे भारतीयांशी चांगले संबंध आहेत. भारत आता क्वाडचा एक भाग आहे आणि आम्ही भारतासोबतचे आमचे संबंध सतत मजबूत करत आहोत. असे असूनही भारतात अमेरिकेच्या व्हिसासाठी लागणारा वेळ सर्वाधिक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जगभरातील इतर देशाच्या तुलनेत अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी लागणारा वेळ हा सर्वाधिक आहे. अमेरिकेच्या B1-B2 व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना सुमारे ४५० ते ६०० दिवस वाट पाहावी लागते. दरम्यान पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर असतानाच भारतीयांना व्हिसासाठी लागणाऱ्या कालावधीबद्दल अमेरिकेच्या संसदेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास लागणाऱ्या वेळेवर अमेरिकन खासदारांनी प्रश्न उपस्थित केला असून, भारत हा अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा मित्र देश आहे, त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवायला हवी, असे देखील येथील खासदारांनी संसदेत बोलताना स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे सिनेटर मायकेल वॉल्ट्ज म्हणाले की, 21 व्या शतकात अमेरिकेचे भारतासोबतचे आर्थिक, राजनैतिक आणि संरक्षण संबंध सर्वात महत्त्वाचे आहेत. असे असतानाही भारतीयांना व्हिसासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागणे वेदनादायी आहे. पुढे ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील व्यापार 150 डॉलर अब्जांपेक्षा जास्त आहे. तरीदेखील मुंबईमध्ये ५८७ दिवस वेटिंग करावे लागते. दरम्यान पीएम मोदी लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर येत आहेत, तर मग भारतीयांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काय करत आहोत? आम्ही भारतासाठी काही विशेष धोरण बनविण्याचा विचार करत आहोत की नाही? असा प्रश्न देखील मायकेल वॉल्ट्ज यांनी अमेरिकन संसदेत उपस्थित केला आहे.