पुढारी ऑनलाईन: चीनने भारताकडील सीमेवर पुन्हा एकदा कुडघोड्या करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी भारतातील अरूणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली आहेत. चीनने केलेल्या भारतीय भूभाग नामांतराच्या निर्णयाविरूद्ध अमेरिका देखील भडकली असून, अमेरिकेने भारताची साथ दिली आहे. यावर अमेरिकेने महत्त्वपूर्ण टीपणी देखील केली आहे.
चीन काही केल्या आपल्या चालींपासून परावृत्त होत नाही. आता त्यांनी अरुणाचल प्रदेश राज्यातील ११ ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. यावर अमेरिकेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर बोलताना व्हाईट हाऊसने मंगळवारी (दि.०५) सांगितले की, अरुणाचल प्रदेशच्या भारतीय भूभागावर दावा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आम्ही तीव्र विरोध करत आहे. आमच्यावर आणि भारतीय भूभागावर दावा करण्याचा हा चिनींचा आणखी एक प्रयत्न असून, क्षेत्रांचे नाव बदलून प्रदेशावर दावा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करत असल्याचे देखील अमेरिकेने म्हटले आहे.
चीन-भारत सीमा प्रश्नावर चीनने पुन्हा मोठे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे. अरूणाचल प्रदेशातील काही भागांवर आपला दावा बळकट करण्यासाठी चीनने नवीन युक्ती अवलंबली आहे. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांच्या नावांची तिसरी यादी (India-China Border Dispute) चिनी, तिबेटी आणि पिनयिन या तीन भाषांमध्ये जारी केली आहे. परंतु भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी चीनचा अरूणाचलवरील हा दावा फेटाळून लावला आहे.
ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी (दि.४) अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या ११ ठिकाणांमध्ये दोन भूभाग, दोन निवासी क्षेत्रे, पाच पर्वत शिखरे आणि दोन नद्यांचा समावेश आहे. यापूर्वी देखील चीनने तीनवेळा अरूणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे (India-China Border Dispute) बदलली आहेत. चीनचे हा दावा यापूर्वीही भारताने नाकारला आहे.
अरूणाचल प्रदेशांच्या बदललेल्या ११ ठिकाणांच्या नावांची ही तिसरी यादी आहे. यापूर्वी २०१७ मध्ये देखील अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांच्या प्रमाणित नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. २०१७ मध्ये, दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीनंतर काही दिवसांनी, चीनने पहिली यादी जाहीर केली होती. दरम्यान दलाई लामा यांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनने जोरदार टीका केली होती. यानंतर २०१२ मध्ये चीनने अरुणाचलमधील १५ ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती.
अरुणाचल प्रदेशाबाबत चीनसोबत दीर्घकाळापासून सीमावाद सुरू आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल प्रदेशातील सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनचा दावा आहे. तर, अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असूनही चीन आपल्या कारवाया मागे घेत नाही. चीनकडून वारंवार कारवाया केल्या जात आहेत.