Latest

Weather Forecast | उत्तर भारतासह ‘या’ राज्यांतही अतिवृष्टीचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक भागात पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे, तर डोंगराळ भागात भूस्खलन तर मैदानी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत आज (दि. १० जून) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढच्या काही दिवसात उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांना अतिवृष्टीचा इशारादेखील हवामान विभागाने दिला आहे. (Weather Forecast)

Weather Forecast : देशात कोणत्या भागात काय असणार पावसाची स्थिती

वायव्य भारत : आज पश्चिम हिमालयीन प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये हलका ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच आजपासून (१० जूलै) ते बुधवारपर्यंत (१२ जूलै) वायव्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता (Weather Forecast) आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

पश्चिम भारत : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील घाट भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच पश्चिम भारतातील राज्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

पूर्व आणि ईशान्य भारत : येत्या पाच दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिशामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर झारखंडमध्ये 10-12 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर देखील आजपासून मुसळधार पाऊस पडणार आहे. तर बिहारमध्ये ११ ते १३ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मध्य भारत : पुढच्या पाच दिवसांत मध्य भारतातील राज्यांमधील काही प्रदेशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी आज (दि.१० जून) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारत: पुढील ५ दिवसांत कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या शाळा बंद

राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, यमुना नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून, उद्यापर्यंत यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. दिल्लीत रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणत पाणी साचले आहे, या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नोएडाच्या जिल्हा प्रशासनाने सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद, हरियाणातील फरिदाबादमधील तर गुरुग्राममधील खाजगी शाळा आज बंद राहणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये देखील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्या कारणाने पुढचे दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला

मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. यामुळे वाहतुक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गृहमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या संपर्कात आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही संपर्क साधला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT