पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल २ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती आयएमडी पुणेचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडेलवरून (ट्विटर) दिली आहे.
डॉ. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज (दि.१९ ऑगस्ट), उद्या रविवारी (दि.२०) विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच येत्या २ दिवसांत मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात मान्सून अधिक राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, मराठवडयासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नागपुरात बऱ्याच दिवसांनी काल शुक्रवारी पावसाने हजेरी लावली होती. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात १९ आणि २० ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सगळीकडे हलका ते मध्यम स्वरुपाच्या आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.