Latest

विशाळगडावर पाणी टंचाई; आठ दिवसातून केवळ अर्धा तासच पाणी पुरवठा

निलेश पोतदार

विशाळगड : सुभाष पाटील छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले विशाळगडावरील इतिहासाच्या खुणा काळाच्या ओघात नष्ट होवू लागल्या आहेत. गडाचे बुरुज, तटबंदी, ऐतिहासिक वास्तू अंतिम घटका मोजताहेत. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या या गडावर दररोज भाविक, पर्यटक आणि इतिहासप्रेमींची कायम गर्दी असते. मात्र सध्या गडावर पाणी समस्या गंभीर बनली आहे.

पाणीयोजना कुचकाम्या ठरल्याने गडवासीय परिसरात खोदलेल्या झऱ्यातले पाणी वाटीने किंवा नारळाच्या करवंटीने गोळा करताहेत. पाण्याच्या गंभीर समस्येमुळे भाविक, पर्यटक तसेच गडवासीय त्रस्त आहेत.

विशाळगड आणि पाणी टंचाई गेल्या कित्येक वर्षाचं समीकरण आजही बदललेलं नाही, पाणी टंचाई गडवासीयांच्या पाचवीलाच पुजलेली. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात गडवासीयांना पाण्याचा प्रश्न अधिक भेडसावतो. या महिन्यात त्यांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. पर्यटकांची तहान भागावण्याबरोबरच स्वतःच्या घोटभर पाण्यासाठी त्यांची रात्र-दिवस धडपड सुरू असते. गेल्या वीस वर्षात विशाळगडासाठी कोट्यवधीच्या पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. दहा-बारा वर्षापूर्वी उभारलेल्या पन्नास लाख रुपयांच्या पाणी योजनेमधून सध्या ८ ते १० दिवसातून केवळ अर्धा तासच अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती गडवासीयांनी दिली.

गेळवडे जलाशयात उभारण्यात आलेल्या जॅकवेल मधून गडाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र कासारी धरणातील पाणीसाठा खालावल्याने  विहिरीनेही तळ गाठला आहे. त्यामुळे गडावर पाणीपुरवठा अपुरा पडत आहे, शिवाय गडवासीयांची पाणीपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. तीन किलोमीटर अंतराहून गडावर पाणीपुरवठा होत असल्याने दुरुस्ती देखभालीसाठी मोठा खर्चही होत आहे. ग्रामपंचायतीला उत्पन्न कमी आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च मोठा असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. सध्या गडावर मोठी पाणी टंचाई असल्याने नागरिकांनी केवड्याचे बन, गौरीचे तळे, रामेश्वर मंदिर, शिवकालीन विहीर आदी या डोंगर परिसरात खोदलेल्या झऱ्यातील पाणी वाटी किंवा नारळाच्या करवंटीने गोळा करावे लागत आहे. झरे, विहीरीचे पाणी आटत चालले आहे. त्यामुळे गडवासीयांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.

गडावर नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र, उन्हाच्या तडाख्याने ते आटले आहेत. थोड्या प्रमाणात शिल्लक असलेले पाणी भरण्यासाठी येथील नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहेत. तसेच पाणी वाहण्यासाठी येथील नागरिकांना व महिलांना कामधंदे सोडून तासनतास वाया घालवावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील नागरिकांना जिवाशी तडजोड करावी लागत आहे.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT