Latest

Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम, विशाल पाटील ‘पुन्हा’ दिल्लीत

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाने उमेदवार घोषित करूनही सांगली लोकसभेसाठी काँग्रेस अजूनही आग्रही आहे. काँग्रेस नेते, माजी मंत्री विश्वजीत कदम आणि सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे अपेक्षित उमेदवार विशाल पाटील पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या (दि.६) सकाळी ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, राज्यातील प्रमुख कॉंग्रेस नेत्यांनी सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याला झुगारून ठाकरे गटाने सांगलीत प्रचार सुरू केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेले काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांनी आपापल्या वाट्याच्या काही जागा घोषित केल्या. मात्र काही जागांवरील तिढा अजूनही कायम आहे. सांगली लोकसभेसाठी शिवसेनेच्या वतीने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली. त्यानंतरही सांगली लोकसभा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला आहे, असे म्हणत काँग्रेसने त्यावर आपला दावा कायम ठेवला आहे. त्यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि सांगली लोकसभेसाठी काँग्रेसचे प्रस्तावित उमेदवार विशाल पाटील हे पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झाले आहेत.

यापूर्वी देखील सांगली लोकसभा काँग्रेसने लढवावी, यासंदर्भात बातचीत करण्यासाठी आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटील, सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत हे दिल्लीला आले होते. तेव्हा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर पक्षाने मान्यता दिल्यास मैत्रीपूर्ण लढत करायची वेळ आली तरी ती करायची तयारी आहे असे स्पष्ट संकेतही विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी दिले होते. त्यानंतर आज चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत सांगलीत असतानाच पुन्हा एकदा विश्वजीत कदम आज दिल्लीत दाखल झाले. उद्या पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाल यांना भेटून सांगली लोकसभेवर काँग्रेस पक्षाची दावेदारी सांगणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढवायचीच, या भूमिकेत काँग्रेस पक्ष दिसत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT