Lok Sabha Election 2024 : विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे यांच्याविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार | पुढारी

Lok Sabha Election 2024 : विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे यांच्याविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यांच्या पित्याचा अवमान केल्याने तातडीने कारवाई करा, अशी मागणी भाजपतर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याविषयीची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना भेटल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. Lok Sabha Election 2024

विलास मुत्तेमवार यांनी अत्यंत खालच्या स्तराच्या भाषेचा वापर केला असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी यांना दिले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, मुत्तेमवार यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करेल.
दरम्यान,काँग्रेसने आपल्या अधिकृत पेजवर ‘मी दीक्षाभूमी बोलतोय’ असा एक व्हिडिओ टाकला आहे. यात जात, धर्म, पंथाच्या नावावर मत मागणारा हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत पेजवर आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यावरदेखील कलम 123 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी भाजपने आज निवडणूक आयोगाला केली आहे. Lok Sabha Election 2024

निवडणूक धुमशान सुरू होताच रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांना जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणात निवडणूक लढण्यापासून अपात्र व्हावे लागले. मध्यंतरी गडकरी यांच्या मुलाच्या प्रचारसभेतील व्हिडिओने खळबळ उडविली. आता नागपुरातील काँग्रेस उमेदवाराला भाजपने घेरण्याचा प्रयत्न केल्याने कडक उन्हासोबतच नागपूर जिल्ह्यातील निवडणुकीत वातावरण तापल्याचे दिसत आहे. यासंदर्भात मुत्तेमवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी ‘पुढारी’ शी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button