Latest

लैंगिक अत्याचार प्रकरण; गोव्यातील मंत्र्याचा राजीनामा

अनुराधा कोरवी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : नगरविकास व समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला. काँग्रेसने कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी केलेल्या आरोपांचा मुक्त आणि पारदर्शक तपास करता यावा म्हणून आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना उद्देशून सादर केलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ तो राजीनामा स्वीकारत पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे पाठविला आहे. वाराणसी दौर्‍यावरून आज रात्री उशिरा मुख्यमंत्री गोव्यात परतले. त्यानंतर त्यांनी हा राजीनामा स्वीकारला.

दरम्यान, कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात मिलिंद नाईक अडकल्याचे काँग्रेसने अखेर बुधवारी (दि. 15) दुपारी जाहीर केले. हे प्रकरण पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसने उघडकीस आणले होते. त्यावेळी त्यांनी नाव जाहीर केलेले नव्हते. मंत्र्याना हटविण्यासाठी अखेर मुदत संपली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मिलिंद यांचे नाव उघड करत कारवाईची मागणी केली होती.

काँग्रेस भवनात बुधवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेस दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष ज्यो डायस आणि कायदा विभागाचे कार्लुस परेरा उपस्थित होते. यावेळी चोडणकर यांनी सांगितले की, आम्ही भाजप सरकारला संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी मुदत दिली होती; परंतु, त्यांनी ती पाळली नाही. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सोमवारी निवेदन देऊन संबंधित मंत्र्याचे नाव त्यांना सांगितले होते. पक्षाने सकाळी मंत्री नाईक यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता तरी रीतसर कारवाई करून मंत्री नाईक यांना बडतर्फ करावे, अशी मागणी चोडणकर यांनी बुधवारी दुपारी केली होती.

संबंधित पीडित महिला ही बिहारची असल्याने त्या महिलेस तेथील मुख्यमंत्री नितीश कुमार न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ते तिच्या पाठीशी उभे राहतील, असेही ते म्हणाले. ज्या-ज्या ठिकाणी अन्याय होतो, त्या ठिकाणी आवाज उठविण्याचे काम काँग्रेस करीत आली आहे.

ते सांगणेही लज्जास्पद !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, मावळते मंत्री मिलिंद नाईक यांच्याविषयी सापडलेले पुरावे एवढे घाणेरडे आहेत, ते सांगणेही लज्जास्पद वाटते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे नुकतेच गोव्यात येऊन गेले, त्यांनी गोव्यातील लोक अधर्मी असल्याचे सांगितले होते. त्यांनी आता भाजपमधील मंत्री कसे अधर्मी आहेत, हे लक्षात घ्यावे, अशी टीकाही केली.

दरम्यान, चोडणकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हवेत बाण न सोडता नाव जाहीर करण्याचे आव्हान चोडणकरांना दिले होते. चोडणकरांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांना निवेदन देत त्या मंत्र्याचे नावही सांगितले होते. त्यानंतर शेट तानावडे यांनी राज्यपालांना त्या मंत्र्याचे नाव विचारावे, असा खोचक टोला लगावला होता. आता या प्रकरणातील गुपित जगजाहीर झाले.

हवेत केलेले आरोप : मिलिंद नाईक

मंत्री मिलिंद नाईक म्हणाले की, आपण गेली तीन दशके राजकारणात आहे आणि दोन दशकांहून अधिक काळ लोकांचा विश्वास आणि प्रेम यांच्या जोरावर जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहे. माझा हजारो लोकांशी संपर्क येतो, यात ओळखीचे आणि अनोळखी असे अगणित व्यक्ती आहेत. त्यामुळे अशा हवेत केलेल्या आरोपांना काय उत्तर द्यावे हा माझ्यापुढे प्रश्न आहे.

पणजी महिला पोलिसांत तक्रार

कथित महिला लैंगिक अत्याचारप्रकरणी मावळते मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी पणजी महिला पोलिस स्थानकात बुधवारी दुपारी रीतसर तक्रार नोंदविली आहे. त्याशिवाय प्रकरणातील सबळ पुरावे पोलिसांकडे सादर केल्याचे आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस भवनात झालेल्या परिषदेला प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक, प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांची मुख्यत्वे उपस्थिती होती.

आमोणकर म्हणाले की, पीडित महिला आपल्याकडे आली होती तिने दिलेल्या माहितीनुसारच आम्ही पुढील पाऊल उचलले. तिने मंत्र्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे आम्हाला सांगितले. तसेच या प्रकरणातील पुरावेही आपणाकडे दिले. मात्र, त्यानंतर ती गोव्यातून गायब झाली. काही दिवसांपूर्वी ती आपणाकडे आली होती आणि तिने पुरावा असलेला मोबाईल मागितला. परंतु, महिला तक्रार देण्यास दचकत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना याची माहिती आम्ही दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT