सटाणा(जि. नाशिक) :पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील वनोली येथील शेतकरी पुत्राने यूपीएससी परीक्षेत यशश्री खेचून आणली असून यामुळे संपूर्ण तालुकाभरातूनच कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. वनोली येथील प्रगतिशील शेतकरी संजय भामरे यांचा चिरंजीव सागर याने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. यामुळे भामरे कुटुंबीयांचे तालुकाभरातून अभिनंदन होत आहे.
सागर याने दहावीपर्यंतचे शिक्षण राहता येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केले असून अकरावी व बारावी नाशिक येथे पूर्ण केल्यानंतर पुणे येथील व्हीआयटी कॉलेजमध्ये बीई बिटेकचे उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली येथे एक वर्ष यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करून तो पुण्यात परतला. त्यानंतर खोलीवर राहून ऑनलाइन पद्धतीने तो परीक्षेचा अभ्यास करीत होता. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतर चालू वर्षी मात्र त्याने तिसऱ्या प्रयत्नात ५२३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादित केले आहे. त्याचे आई-वडील शेती करतात तर आजोबा सटाणा येथील जिजामाता हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक होते. वयाच्या २७ व्या वर्षी सागरने हे यश प्राप्त केले असून शेतकरीपुत्राने गाठलेली ही मजल पाहता तालुकाभरातून त्याचे व कुटुंबीयांचे अभिनंदन होत आहे.
हेही वाचा ;