अंबड, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यासह परिसरात वातावरणातील अचानक बदलामुळे अवकाळी पावसासह गारांचा पाऊस पडल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज सायंकाळी तालुक्यातील बहुतांश ठिकाणी गारांच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे रब्बीच्या पिकांसह खरिपाच्या पिकांनाही फटका बसल्याचे दिसून आहे. हातातोडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
अंबड तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांचे सुमारे ४५ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. पालेभाज्या तसेच रब्बी व बागायती पिकांचीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने या पावसाचा पिकांना चांगलाच फटका बसला.
अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने कपाशी पिकाच्या शेतातच वाती झाल्या आहेत. तसेच शेतातील काढणी केलेली तूर देखील भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या पावसाने गहू तसेच हरभरा पिकावर रोग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजनांचा मार्ग निवडावा लागणार आहे. रब्बी पिकांना आता पूर्वस्थितीत आणण्यासाठी तसेच फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च लागणार आहे.
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : दूनगाव परिसरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली लावली. यावेळी पडलेल्या गारांमुळे रब्बी पिके व फळबागांचे आतोनात नुकसान झाले आहे.
अवकाळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. काढणीस आलेल्या तुरीलाही मोठा फटका बसला असून ज्वारीचे पीकाचेही मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना वांरवार बसत असून, यापुढे शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.
तीर्थपुरी; पुढारी वृत्तसेवा – येथे कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील शेतकरी विष्णू गोखरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाने पेट घेतला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तीर्थपुरीत गेली दोन दिवसांपासून तीर्थपुरीसह परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हवेत गारवा हेाता. आज सायंकाळी ४ वाजता तीर्थपुरीसह परिसरात पावसाला सुरूवात झाली. काही ठिकाणी गाराही पडल्या. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मोसंबी आदी पिकांना मोठा फटका बसणार आहे. शिवाय ऊसतोड बंद होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.
वालसावंगी; पुढारी वृत्तसेवा – अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यातील वालसावंगी शिवारातील लांडगी भागात गट क्र 436 मध्ये बाभळीच्या झाडावर वीज पडली. झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांपैकी एक बैल यात ठार झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रूपयांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामा करून सदर शेतकऱ्यास मदत करावी अशी मागणी रामदास वाघ, भगवान लोखंडे, गजानन वाघ यांनी केली आहे.
हेही वाचा