Latest

Corona Mock Drills : केंद्रीय आरोग्य मंत्री मंडाविया यांनी केली कोविड प्रतिसादात्मक मॉक ड्रीलची पाहणी

अविनाश सुतार

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा कोरोनाचे संकट उद्भवले, तर त्याला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांनी आपल्या सुसज्जतेला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील प्रमुख रुग्णालयांमध्ये मंगळवारी कोविड प्रतिसादात्मक मॉक ड्रील (Corona Mock Drills) करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात जाऊन या मॉक ड्रीलची पाहणी केली.

कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. तर कोणकोणते उपाय योजायचे, यावर मॉक ड्रीलमध्ये (Corona Mock Drills) भर देण्यात आला होता. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राज्यांतील कोविड रुग्णालयांमध्ये हे मॉक ड्रील करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत हे मॉक ड्रील अत्यंत आवश्यक होते, असे मंडाविया यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. जगाच्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भारतातही येत्या काही काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगतानाच जनतेने कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन करावे, असे आवाहन मंडाविया यांनी केले.

रुग्णालयांना आवश्यक ती उपकरणांची पूर्तता भरुन काढण्यास सांगण्यात आले असून गरजेनुसार मनुष्यबळ तैनातीचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालयांची तयारी ही फार महत्वपूर्ण बाब आहे, असे सांगतानाच सरकारी रुग्णालयांसहित खासगी रुग्णालयांनी देखील मॉक ड्रीलमध्ये सहभाग घेतला होता, असे मंडाविया यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT