परिंचे : कोरोनापेक्षा अफवांचेच उदंड पीक; टीव्ही चॅनेल, सोशल मीडियातील धुमाकूळ घालतोय गोंधळ

परिंचे : कोरोनापेक्षा अफवांचेच उदंड पीक; टीव्ही चॅनेल, सोशल मीडियातील धुमाकूळ घालतोय गोंधळ

परिंचे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनापेक्षा त्याच्या अफवांचाच बाजार सध्या गरम झाला आहे. टीव्ही चॅनेल, सोशल मीडियाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने ग्रामीण भागात यावर एकच चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या नवीन बीएफ.7 विषाणूमुळे चीनमध्ये रुग्णसंख्येची त्सुनामी आली असून, राजधानी बीजिंगमध्येही या साथीने शिखर गाठले आहे.

इतर शहरांचीही साथीच्या विस्फोटाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. दरम्यान, चीन सरकारने कोरोनाबाधितांची सरकारी आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वच वातावरण संशयित होत चालले आहे. मात्र, आपले टीव्ही व सोशल मीडियावाले काही मागे हटायला तयार नाहीत. चीनमधील खरी-खोटी भयावह स्थिती दाखविण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू आहे.

पुरंदर तालुक्यातील खेडोपाड्यांत, चावडी, गावच्या पारावर, चौकाचौकांत, अनेक जण कोरोना तसेच लॉकडाऊनसंदर्भात आपापले ठोकताळे सांगून विनाकरण चर्चा करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच गढूळ होत चालले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एम्सचे माजी संचालक डॉ. रणजित गुलेरिया यांनी भारताला सध्यातरी कोरोनाचा धोका नाही, तरीही लोकांनी सावधान राहणे गरजेचे असून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वेच्छेने पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विघ्नसंतोषी मंडळी कोरोना व लॉकडाऊनचे भांडवल करून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरविण्याचे काम करीत आहेत. अशा खोट्या अफवा पसरवून सार्वजनिक जीवनातील वातावरण खराब करीत आहेत. अशा लोकांवर पोलिस प्रशासनाने वेळीच कारवाई केली, तर अफवा पसरविणार्‍याच्या मनात दहशत निर्माण होईल व सर्वसामान्य जनतेला खरे काय आहे, तेच समजेल.
चिनी लोकांपेक्षा भारतातील लोकांची प्रतिकारशक्ती कैक पटींनी चांगली असून, पूर्वीचा अनुभवही अनेकांच्या गाठीशी असल्यामुळे आपण सर्व कोरोनाच्या या नवीन विषाणूचा मुकाबला करू शकतो. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. फक्त प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे जास्तीत जास्त पालन करावे, असे जाणकार डॉक्टरांनी या वेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news