Latest

नाशिक : चिमुकलीने मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याचा बछडा आणला घरी, सगळेच झाले अवाक

गणेश सोनवणे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शेतात बागडणार्‍या चिमुकल्यांना लोभस पिल्लू सापडले आणि त्यांनी ते आनंदाने कवेत घेत घरी आणले. घरच्यांनीही बालगोपालांच्या भूतदयेचा अप्रूप वाटून त्यांनीही त्या पिल्लाचा स्वीकार केला. परंतु, त्या पिल्लाचा एकूणच बाज लक्षात घेता ते मांजरीचे नव्हे तर बिबट्याने बछडे असल्याचे स्पष्ट होताच सर्वच अवाक झाले.

एव्हाना मातेपासून दुरावलेल्या त्या बछड्याने अन्नपाणीही सोडले होते अन् योग्य पोषणाअभावी त्याला त्वचारोगही झडला. तेव्हा पशुवैद्यकाची आवश्यकता निर्माण होऊन अखेर हे बछडे वन विभागाकडे सुपूर्द झाले. आठवड्याभरात कमालीचा जिव्हाळा लागलेल्या चिमुकल्यांची त्यापासून वेगळे होताना जीवाची घालमेल झाली परंतु, वडिलधार्‍यांनी समजूत काढल्यानंतर तेही राजी झालेत.

हा प्रकार तालुक्यातील खाकुर्डी-मोरदर शिवारात घडला. रावसाहेब ठाकरे यांचे मोठे एकत्र कुटुंब आहे. काटवनचा हा भाग जंगलमय आहे. त्यात बिबटे, कोल्हे, हरिण आदी प्राण्याचा अधिवास आहे. अडीच महिने वयाचे मादी जातीच्या बछड्याची बिबट्यापासून ताटातूट झाली. ते भुकेच्या वेदनेने हे पिल्लू ठाकरे यांच्या शेतात भटकत असताना बागडणार्‍या चिमुकल्यांच्या नजरेस ते पडले. त्यांना ते मांजरीचे पिल्लू वाटले. हिंस्त्र प्राणी असला तरी ते भुकेने कुपोषित झाले होते. शक्ती क्षीण झाल्याने त्याने मुलांना विशेष प्रतिकार करण्याऐवजी सुरक्षिततेच्या भावनेने विसावले. वेदांत, तीर्थ, दक्ष, अथर्व आणि तनुजा या बालकांनी त्याला घरी आणून दूध भाकरची व्यवस्था लावली. पाच दिवस हे बछडे चांगलेच रुळले, मात्र त्याने आहार तोडला. सर्वच बुचकळ्यात पडले. तोपर्यंत त्याचा एकूणच वावर, केसांचा प्रकार पाहून तो मांजरीचे नव्हे तर बिबट्याचे बछडे असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले.

मादी बछड्याच्या शोधात येईल आणि घेऊन जाईल, या आशेवर बछड्याला रात्री घराबाहेर ठेऊन पाहिले. परंतु, तसे काही झाले नाही. शिवाय, बछड्याला त्वचारोगही जडल्याचे निदर्शनास आल्याने ठाकरे कुटुंबाने वन विभागाशी संपर्क साधला. वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या पथकाने बछडे ताब्यात घेत दि. 9 मे रोजी ते मालेगावी आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी बछड्याची तपासणी केली. त्याने अन्नपाणी सोडले होते. भूक त्यात त्वचारोग यामुळे ते अधिकच क्षीण झाले होते. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरु करत औषधोपचार केला. त्यास प्रतिसाद देऊन बछड्याने जेवण घेण्यास सुरुवात केली. तीन दिवसांत बर्‍यापैकी ताजेतवाने झाल्यानंतर वन विभागाच्या रेस्न्यू टीमकडे ते सोपविण्यात आले. बुधवारी (दि.11) ते नाशिक रवाना करण्यात आले. याठिकाणी योग्य प्रकारे संगोपन केले जाणार असून, योग्य वेळी त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे डॉ. खाटीक यांनी सांगितले.

माणसाळले अन् जीव्हाळाही…
बिबट्या हा हिंस्त्रप्राणी असून, त्याचे बछडेही लहानपणापासून तत्काळ तीव्र प्रतिक्रिया देत असतात. मात्र, या प्रकरणात ते बछडे सहाय अवस्थेत बालकांच्या संपर्कात आले. बालसुलभ जिव्हाळा निर्माण झाला. दोन वर्षीय तनुजा या चिमुकलीच्या ते अंगाखांद्यावरील झाले होते. तिच्याजवळच ते झोपी जायचे. आठ दिवसांतच माणसाळले. तेवढ्या सहवासात बालगोपालांचा ते जीव की प्राण झाले होते. त्यामुळे ही ताटातूट त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या कष्टप्रद ठरली. वन विभागाच्या पिंजर्‍यात बछड्याला करमेनासे झाले होते.

बिबट्याचा बछड्याची तपासणी करताना डॉ. जावेद खाटीक

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT