Latest

 UGC NET 2023 : नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखा जाहीर; ‘ही’ आहे अंतिम तारीख

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही नेट परीक्षा देणार आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा 'नेट' (NET-National Eligibility Test ) येत्या जून महिन्यात होत आहे. जून महिन्यातील १३ ते २२ जून या कालावधीत विविध विषयांसाठी ही परीक्षा होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA :National Testing Agency) आजपासून नेट परीक्षेसाठी अर्ज भरुन घेण्यास सुरुवात करत आहे. या संदर्भात युजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी मंगळवारी (दि.९ मे) घोषणा केली आहे. जाणून घ्या नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख, परीक्षेच्या तारखा, परीक्षेसाठी अर्ज कुठे करायचा, इत्यादी सर्व तपशीलवार माहिती. UGC NET 2023
बऱ्याच विद्यार्थ्यांना नेट परीक्षा देऊन शिक्षक बनण्याची इच्छा असते. जर तुम्ही या विद्यार्थ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA :National Testing Agency) आजपासून UGC NET 2023 या परीक्षेसाठी अर्ज भरुन घेण्यास सुरुवात होत आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास इच्छुक आहेत ते युजीसीच्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करु शकता.

'युजीसी'च्या अध्यक्षांनी दिली माहिती

'युजीसी'चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, नेट परीक्षा ऑनलाईन अर्ज १० मे २०२३ पासून भरण्यास सुरुवात झाली आहे.  ३१ मे २०२३ च्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करु शकता. ही परीक्षा १३ जून २०२३ ते ३१ मे २०२३ दरम्यान होईल. युजीसीच्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करु शकता".

UGC NET 2023 संदर्भात काही महत्त्वपूर्ण तारखा

  • नेट परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख : १० मे २०२३
  • नेट परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख : ३१ मे २०२३
  • नेट परीक्षा तारीख : १३ जून ते २२ जून

 UGC NET 2023 : अर्ज कसा भराल

  • प्रथम युजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जा
  • त्यानंतर वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर (Home page) जाऊन "येथे नोंदणी करा" या पर्यायावर क्लिक करा
  • आवश्यक तपशील भरा आणि नोंदणीकृत फोन नंबर आणि ईमेल आयडी वर आलेला OTP वापरून लॉग इन करा
  • आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी जेपीजी (jpg) स्वरूपात अपलोड करा
  • तपशील पुन्हा तपासा आणि तुमच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरा
  • फॉर्म सबमिट करा आणि फॉर्म सबमिट नंतर प्रिंटआउट घ्या

८३ विषयांसाठी परीक्षा 

युजीसी नेट परीक्षा जूनमध्ये ८३ विषयांसाठी CBT मोडमध्ये (Computer-based training) घेतली जाईल. परीक्षेत दोन पेपर असतील. परीक्षा देण्यासाठी उमेदवार इंग्रजी किंवा हिंदी भाषा निवडू शकतात.  प्रत्येक बरोबर उत्तरासाठी २ गुण दिले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक चिन्हांकित केले जाणार नाही.

SCROLL FOR NEXT