करियरचा मार्ग बदलताना… | पुढारी

Published on
Updated on

'अ‍ॅपल'चे सर्वेसर्वा दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांनी म्हटले होते की, एका रात्रीत झालेला सुपरस्टार किंवा रातोरात मिळालेल्या यशाचे अगदी जवळून अवलोकन केले तर ते साध्य करण्यासाठी दीर्घकाळ लागलेला असतो. जॉब्स यांचे हे मत नव्याने रोजगार शोधणार्‍या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण अनेक युवामंडळी श्रीमंत किंवा नामांकित लोकांना डोळ्यासमोर ठेवून ध्येय निश्चत करतात. त्याचवेळी ही मंडळी त्यांचे श्रम, मेहनतीकडे फारसे लक्ष देत नाही. 

कोणतीही व्यक्ती एका रात्रीत श्रीमंत झालेली नसते किंवा नायक बनलेली नसते. परंतु काहींच्या मनात भ्रामक कल्पना दडलेल्या असतात. कोणत्याही क्षेत्रात करियर करताना या गोष्टीची वास्तविकता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नोकरदार तरुण किंवा उद्योजक हा कालांतराने वेगळा मार्ग म्हणून नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार करतो. यामागची अनेक कारणे असू शकतात. नोकरदार हा व्यवसाय करू इच्छितो किंवा व्यावसायिक हा नोकरी करू इच्छितो. परंतु हा विचार वास्तवाला धरून आहे काय, याची चाचपणी करणे गरजेचे आहे. 

जेव्हा एखाद्या युवकाला रोजगाराची गरज असते, तेव्हा त्याच्यासमोर दोन पर्याय असतात. पहिला व्यवसाय आणि दुसरे म्हणजे नोकरी. यापैकी एकाची निवड करावी लागते. एका ठराविक काळानंतर नोकरी किंवा व्यवसायात तोचतोपणा येतो आणि नावीन्य निघून जाते. अशावेळी करियर बदलण्याचा विचार केला जातो. नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय किंवा व्यवसाय सोडून नोकरीची कास धरली जाते. परंतु खरे प्रश्न इथूनच सुरू होतात. प्रत्यक्षात करियर बदलण्याचा निर्णय घाईगडबडीत घेऊ नये, असे सांगितले जाते. संयम आणि गांभीर्याने त्यावर विचार करायला हवा. सात-आठ वर्षे नोकरी केल्यानंतर व्यवसाय सुरू करणे हा पोरखेळ नाही. या प्रकारे व्यवसाय बंद करून एकाच ठिकाणी नोकरी करण्याचा निर्णय देखील वाटतो तेवढा सोपा नाही. दोन्ही क्षेत्रं हे सर्वार्थाने वेगवेगळे आहेत. ज्या उद्देशाने आपण करियरचा मार्ग बदलत आहोत, तो उद्देश पूर्ण होईलच याची खातरजमा करता येत नाही. कारण अनेकदा करियरचा मार्ग बदलण्याने पश्चात्ताप करण्याचीही वेळ येते. जेव्हा ही बाब समजते, तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे भावनेच्या भरात, स्पर्धेत एकमेकांना मागे टाकणे या स्थितीत करियर बदलण्याचा विचार करू नये. एका निर्णयामुळे आयुष्य बदलू शकते किंवा भरकटूही शकते. 

काही युवक नोकरी पत्करतात; परंतु बॉसबरोबर त्यांचे खटके उडत राहतात. बॉसकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा पूर्वग्रह मनात निर्माण होतो. अशावेळी नोकरी करताना तो नेहमीच तणावाखाली आणि अस्वस्थ राहतो. जी मंडळी नोकरीला गुलामीचे स्वरूप देतात, ते नोकरी सोडण्याचा किंवा कंपनी बदलण्याबाबत आग्रही राहतात. परंतु अशावेळी निर्णयावर पुनर्विचार करणे क्रमप्राप्त ठरते. नोकरीत आर्थिक सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते. जर आपण वेतनावरून असमाधानी असाल आणि व्यवसाय करू इच्छित असाल तरीही त्यात जोखीम कमी नाही. जर आपण बिझनेस सोडून नोकरीचा विचार करत असाल तरीही ती बाब वाटते तेवढी सोपी नाही. व्यवसायात आपणच मालक आणि नोकर असतो. त्यामुळे आपण म्हणेल ती पूर्वदिशा असे व्यवसायाचे समीकरण असते.

परंतु नोकरीत आपल्याला बॉसच्या म्हणण्यानुसार काम करावे लागते. अशी सवय अंगवळणी पडण्यासाठी बराच काळ जाऊ शकतो किंवा कदाचित पटणारही नाही. म्हणून नोकरी किंवा व्यवसाय असो, त्यात आव्हाने आणि अडचणी याचे प्रमाण कमी-अधिक राहू शकते. म्हणून परिस्थितीपासून पळ काढण्याऐवजी त्याचा संयमाने सामना केल्यास परिस्थितीवर मात करू शकतो. अशा प्रकारचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती निर्माण करणे गरजेचे आहे. कदाचित आपण आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करत नसल्यानेही अडचणी येऊ शकतात. परिणामी यश मिळवण्याचा मार्ग खडतर होत जातो. महत्त्वाकांक्षी असणे चांगले लक्षण आहे, परंतु त्यापेक्षाही स्वत:ची क्षमता ओळखणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.           

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news