Latest

MAHA Politics : राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद ! : उद्धव ठाकरे

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क

महाविकास आघाडीला (MAHA Politics) नुकतीच दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल महाविकास आघाडीचं सोशल मीडियावरून अभिनंदन केलं जात असलं तरी, विरोधी पक्षाकडून टीका करण्यात आली आहे. पण, दोन वर्षं यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकृत ट्विटर हॅंडलवरून पत्र पोस्ट करत महाराष्ट्राच्या जनतचे आभार मानलेले आहे.

"अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या पण आम्ही विचलित झालो नाहीत आणि पुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी त्यांना केंद्रबिंदू मानून आमचं काम अखंड सुरू राहील", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यातील महाविकास आघाडीच्या (MAHA Politics) सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेनं सरकारला आपलं मानून केलेल्या सहकार्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद मानले. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांचं राज्याच्या वाटचालीतलं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही धन्यवाद दिले.

साथीच्या रोगाचा मुकाबला सक्षमपणे करणार

मुख्यमंत्री म्हणतात, "सरकारचा बहुतांश कालावधी कोविडचा अतिशय नेटानं, नियोजनबद्ध रितीनं मुकाबला करण्यात गेला. मात्र जगाला संकटात टाकणाऱ्या या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता, आपल्या सरकारनं वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमानं काम करायला सुरुवात केली. संकटाचं संधीत रूपांतर केलं, हे आपणा सर्वांच्या समोर आहे. दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसंच साधन सुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढ्यात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या आहेतच शिवाय कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यात देखील विविध रोग आणि साथीचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत."

लोकांमध्ये आत्मविश्वास आणला

"शासन आणि प्रशासनात कुठंही नकारात्मकता नव्हती. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागांनी या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल, यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या. देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलं, पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी निर्माण करून या क्षेत्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास आणला. तरुणांना वेगवेगळ्या कौशल्यात पारंगत करून त्यांना रोजगार मिळेल असं पाहिलं."

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही आम्ही लवकरच खुला करणार आहोत. राज्यात विविध शहरांना हवाई सेवेने जोडण्याचे नियोजन आहे. रस्ते, मेट्रो मार्ग यांचे इतके भक्कम आणि दर्जेदार जाळे राज्यात असणार आहे की, गतिमान महाराष्ट्राची नवीन ओळख त्यातून निर्माण होईल. देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईसारख्या महानगरात कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक व इतर मार्ग यामुळे मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महानगराच्या दळणवळण इतिहासात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही."

"हे सर्व करताना वनांचा विकास, वन्य जीवांना संरक्षण, समृद्ध पर्यावरणाचा विचार यांच्याशी कुठंही तडजोड केली नाही. शेतीनं तर कोविडच्या पहिल्या लाटेपासून दमदार कामगिरी करून दाखवली आहे. विकेल ते पिकेलसारखी योजना असो किंवा बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प, शेतकऱ्यांना नवे बळ देत आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना दिलेलं कर्जमुक्तीचं आश्वासन प्रत्यक्ष राबवून दाखवलं आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 20 हजार कोटीहून अधिक रुपयांची कर्जमाफी केली आहे. आमच्या या शेतकऱ्यानं विविध नैसर्गिक आपत्तीत खूप भोगलं आहे आणि त्यामुळेच केंद्राच्या एनडीआरएफ निकषापेक्षा नेहमीच वाढीव मदत करून प्रशासनाने त्यांचे अश्रू पुसले आहेत, अशा विविध आपत्तीत कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा असावा असा आमचा प्रयत्न आहे, त्यावर काम सुरू आहे", अशीही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली.

पहा व्हिडीओ : कोल्हापूर विधानपरिषद : सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, भाजपच्या अमल महाडिकांनी घेतली माघार.

SCROLL FOR NEXT