Latest

भगव्याला कलंक लावणारे हात कायमचे गाडून टाका : उद्धव ठाकरे

गणेश सोनवणे

जळगाव : या गद्दारांना जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार (स्व.) आर.ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यानंतर जाहीर सभा झाली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, निवडणूक आल्यावर तुम्ही प्रचार करता, तुम्ही मरमर राबता, आणि हे पिकोजी वरती बसतात, त्यांना संजय राऊत गुलाबो गँग म्हणतात. यांना वाटतं आपण घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर घोड्याच्या लाथा तुम्ही खायच्या आणि तुम्ही आरामात बसायचं हे आता नाही चालणार. जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे.

हे सरकार म्हणजेच अवकाळी आलेलं संकट…

हे सरकार उलट्या पायाचं सरकार आहे. हे सरकार अवकाळी आलं. हे सरकार म्हणजेच संकट आहे. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर सांगा. जळगावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एका ६२ वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुसरा २६ वर्षाचा मुलगा राहुल राजेंद्र पाटील याने कपाशीला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही म्हणून नैराश्यात आत्महत्या केली. का? कारण त्याने वडिलांकडून पाच एकर शेती कसण्यासाठी घेतली. पीक गेलं. पण पीक गेल्यानंतर वडिलांना तोंड काय दाखवू, वडिलांना पैसे कुठून देऊ? डोक्यावर कर्जाचा बोझा आहे. २६ वर्षाच्या पोराने गळफास लावून घेतला. तुमच्या डोळ्यांमध्ये धुळफेक चालली आहे.

निवडणूक आयोगाचा धृतराष्ट्र झाला

उद्धव ठाकरे म्हणाले, पाकिस्तानलाही विचारले की, शिवसेना कुणाची हे पाकिस्तानही सांगेल पण आमच्या निवडणूक आयोगालाही कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. भ्रष्ट्राचारांचे आरोप असलेले तुमच्यात शुद्ध होत असतील तर आमच्यात असेपर्यंत ते भ्रष्ट कसे असू शकतात. भारतात भाजपशिवाय दुसरा पक्ष ठेवायचा नाही अशी भाजपची निती आहे. एकनाथ खडसेंनी मला २०१४ ला युती राहणार नाही तुटली असे सांगितले. आमचे आता ठरले आता काही नाही हे सांगितले होते. त्यावेळी एकनाथ खडसे भाजपमध्ये होते हे काम त्यांच्या गळ्यात टाकले आणि युती तोडण्यासाठी त्यांना पुढे केले.

आमचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व...

मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेलो तर म्हणे मी हिंदुत्व सोडलं. तीन वर्षात कधी तरी हिंदुत्व सोडलं अस तुम्हाला वाटत? मी कोणत्याही धर्मावर अन्याय होऊ दिला नाही. मंदिर उघडावे म्हणून ढोल बडवले. आपलं हिंदुत्व शेंडी जानव्याच हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. गो हत्येचा संशय आला तर भर रस्त्यात मारतात. महिलांवर अत्याचार झाल्यावर उलट त्यांच्यावर गुन्हे घालतात हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही उध्दव ठाकरेंनी केला.

चोरांच्या हातात भगवा शोभत नाही…
खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ च्या हातात भगवा शोभून दिसत नाही. स्वतःकडे नेता नाही आदर्श नाही म्हणून कोणाची आई चोरायची, कोणाचा बाप चोरायचा मिंध्ये ना आम्ही 48 जागा देऊ अस बावनकुळे म्हणाले. तुम्ही आमचं चोरलेल शिव धनुष्य आणि मोदींचा चेहरा घेऊन या. मी माझं नाव घेऊन येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्ही चोरलेलं धनुष्य घेऊन या आम्ही मशाल घेऊन येऊ कधीही निवडणूक घ्या आम्ही तयार आहोत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT