यहाँ कट्टा बोलता है..! ‘ट्रीगर’वर बोट, ‘गेम’ करण्यावर भर | पुढारी

यहाँ कट्टा बोलता है..! ‘ट्रीगर’वर बोट, ‘गेम’ करण्यावर भर

श्रीकांत राऊत

नगर : नगरची संवेदनशील म्हणून असलेली ‘ख्याती’ सर्वश्रुत आहे. वाळू तस्करी, मटका, जुगार, सट्टेबाजी असे अवैध धंदे चालवून मिळणार्‍या पैशांतून गुन्हेगारीला बळ मिळत आहे. त्यात पोलिस प्रशासनाची डोकेदुखी वाढणारी बाब म्हणजे रेकॉर्डवर नसलेल्या गुन्हेगारांकडेही गावठी कट्टे (पिस्टल) आढळून येत आहेत. काही तर मिसरूडही न फुटलेल्या मुलांचा सहभाग आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात आहे. नगर पोलिसांनी गेल्या सव्वा दोन वर्षांत 118 गावठी कट्टे जप्त करताना 230 जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी 69 ‘आर्म अ‍ॅक्ट’च्या गुन्ह्यांमध्ये 102 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

अवैध धंदे चालविणार्‍यांकडे तसेच स्टेटससाठी बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यांची वाढत असलेली संख्या धक्कादायक आहे. नगर शहरासह जिल्ह्यात बेकायदा शस्त्रांचा सुळसुळाट सुरू असताना कट्टे पुरविणार्‍या ‘एजंटस्’चे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना अपयशच आले आहे. जिल्ह्यात दाखल होणारी बहुतांश अवैध शस्त्रे मध्य प्रदेशातून आणली जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

कट्ट्यांच्या तस्करीचे कनेक्शन मध्य प्रदेश असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. परंतु, मुळापर्यंत जाऊन पाळेमुळे खणण्यात पोलिसांना पाहिजे तितके यश आले नाही. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवायांमध्ये अटक केलेले आरोपी हे पैसे मिळतात म्हणून ग्राहकांना कट्टे पोहोच करणारे आहेत.

डीलर्स आणि एजंटस् पासून पोलिस दूरच आहेत. गावठी कट्ट्यांच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचा तपास सुरू असला तरी जिल्ह्यात कट्टे दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
येणार्‍या काळात गावठी कट्ट्यांची तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

तस्करीत श्रीरामपूर, नेवासा केंद्रस्थानी
श्रीरामपूर शहर तसेच नेवासा तालुक्यात गावठी कट्टे एजंटमार्फत मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. गतवर्षी जून महिन्यात श्रीरामपूर येथील एका हॉटेलच्या परिसरात कट्टे विक्री करणार्‍या तिघांना एलसीबीने बेड्या ठोकल्या होत्या.

पोलिसांचा मध्य प्रदेशात धाडसी छापा
तोफखाना पोलिसांच्या पथकाने 24 जानेवारी 2023 रोजी मध्य प्रदेशात जाऊन कट्टे बनविणार्‍या कारखान्यावर छापा टाकला टाकला होता. जमालसिंग अजितसिंग चावला (रा. खुरमाबाद, जि.बडवानी, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेत कट्टे बनविण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके व त्यांच्या पथकाने ही मोहीम पार पाडली होती.

चोरट्या मार्गाने विक्री
गावठी कट्टे मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा व आसपासच्या गावांत गावठी कट्ट्यांची निर्मिती जोरात चालते. गावठी कट्टे जळगावमार्गे ट्रॅव्हल बसमधून तसेच इतर खासगी वाहनाने मराठवाड्यात पोहोचतात. हेच कट्टे नगर, पुण्यापर्यंत एजंट्समार्फत पोहोचविले जातात.

कट्ट्यांबाबतचे गुन्हे
वर्ष       गुन्हे दाखल   अटक आरोपी
2021       34                48
2022      25                42
2023      10                12
एकूण      69              102

जप्त कट्टे व काडतुसे
वर्ष       कट्टे     काडतुसे
2021   43         67
2022   51       103
2023   24       60
एकूण   118   230

Back to top button