Latest

यवतमाळ हादरले : अनैतिक संबंध, पूर्ववैमनस्यातून दोन तरूणांचा खून

अविनाश सुतार

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तासभराच्या अंतराने पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयातून आणि पूर्ववैमनस्यातून खुनाच्या दोन घटना घडल्या. या घटना सोमवारी रात्री घडल्या. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत खून झालेल्या तरूणाचे प्रवीण संदीप बरडे (वय ३५, रा. नेताजीनगर, यवतमाळ) असे नाव आहे. तर दुसऱ्या घटनेतील मृताचे देवांशू सुरेश सावरकर (वय १९) असे नाव आहे.

पहिल्या घटनेची माहिती अशी की, पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रवीणला होता. यातूनच त्याचा त्याच परिसरातील आरोपी रजनीश उर्फ लाळ्या धर्मराज इंगळे (वय ३१) याच्याशी वाद होता. आजारी असल्याने प्रवीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्र. २४ मध्ये उपचार घेत होता. तर त्याची पत्नी वार्ड क्र. २५ मध्ये भरती होती. रुग्णालयात लाळ्या पोहोचला तेव्हा प्रवीणने त्याच्या कानशिलात लगावली. याचा राग धरत लाळ्याने त्याचा मित्र सुमेध उर्फ गोल्डन रमेश खडसे (वय २९) याला बोलावून घेतले. नंतर प्रकरण समेटाने मिटवू असे सांगून प्रवीणला रुग्णालयातून वाघापूर बायपास परिसरात आणले. तेथे प्रवीणच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून त्याला जीवानिशी ठार केले, अशी तक्रार प्रवीणचे वडील संदीप नारायण बरडे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर काही तासातच आरोपी रजनीश उर्फ लाळ्या धनराज इंगळे याला लोहारा पोलिसांनी अटक केली. तर सुमेध उर्फ गोल्डन हा अजूनही पसार आहे. गुन्ह्याचा तपास लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहे.

बेलफूल विक्री करणाऱ्या युवकाला चाकूने भोसकले

दुसऱ्या घटनेत वीटभट्टी परिसरातील बेंडकीपुरा येथे जुन्या वादातून बेलफूल विक्री करणाऱ्या युवकाला चाकूने भोसकून ठार करण्यात आले. देवांशू सुरेश सावरकर (वय १९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. देवांशू हा त्याच्या वडिलांसोबतच महादेव मंदिरासमोर बेलफूल विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्री १० वाजता तो दुचाकीने घराकडे जात असताना त्याला घराजवळ राहणाराच सोनू उर्फ शेख समीर शेख जमील (वय २०) हा भेटला. तेथून ते दोघेही परत गांधी चौकात आले. तेथून बेंडकीपुरा येथे परत गेले. या भागातील चिकनच्या दुकानासमोर उभे राहून दोघांच्या गप्पा सुरू होत्या. अचानकच त्यांच्यात वाद झाला. सोनू उर्फ शेख समीर याने जुना वाद उकरुन काढत धारदार चाकूने देवांशूच्या पोटात वार केले. देवांशू रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच सोनूने घटनास्थळावरून पळ काढला. देवांशू रस्त्यावर तडफडतोय याची माहिती परिसरातील व्यक्तीने त्याच्या आईला व वडिलांना दिली.

त्यानंतर आईवडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी देवांशूला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे आरोपी सोनू उर्फ शेख समीर याला दारव्हा येथून अटक केली. आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक निरीक्षक सचिन लुले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT