Latest

नोएडातील सुपरटेकचे ४० मजली २ टॉवर्स २८ तारखेला जमीनदोस्त होणार

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या सुपरटेक कंपनीचे चाळीस मजली दोन टॉवर्स आता 28 तारखेला उडविले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी हे आदेश निर्गमित केले. 4 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही स्थितीत ट्विन टॉवर्स पाडले जावेत, असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केलेले आहे. 21 ऑगस्टला दुपारी अडीच वाजता ट्विन टॉवर्स स्फोटकांनी उडविले जाणार होते, मात्र न्यायालयाने हा कालावधी आणखी एका आठवड्याने वाढविला आहे.

पर्यावरणविषयक सर्व नियम धाब्यावर बसवित सुपरटेक कंपनीने नोएडामध्ये चाळीस मजल्यांचे दोन टॉवर्स उभारले होते. हे टॉवर्स वाचविण्यासाठी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात जोरदार प्रयत्न केले होते. तथापि न्यायालयाने सुपरटेकला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नोएडा प्राधिकरणाकडून 28 तारखेला ट्विट टॉवर्स स्फोटकांद्वारे पाडले जातील. तांत्रिक समस्या, प्रतिकूल हवामान अथवा अन्य काही कारणाने 28 तारखेला हे टॉवर्स पाडता आले नाहीत तरी 4 सप्टेंबरपर्यंत ते पाडावेच लागतील, असेही खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आले. ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने अलिकडेच परवानगी दिली होती. टॉवर्समध्ये 9 हजार 400 छिद्रे पाडून 3 हजार 500 किलो स्फोटकांचा वापर करीत हे टॉवर्स जमीनदोस्त केले जाणार आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT