पुढारी ऑनलाईन डेस्क : तुनिषाच्या आईने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता शीझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी तुनिषा शर्मा आणि तिच्या आईविषयी अनेक खुलासे केले आहेत. शीझानची आई, बहीण आणि वकिलाने तुनिषाची आई वनीता शर्मा यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. शीझानची आई आणि बहीण फलक नाज म्हणाल्या, वनीताचे सर्व आरोप खोटे आहेत. आमच्या परिवाराने तुनिषाला मुलीप्रमाणे वागणूक दिली. ती खूश होती. तिला चंदिगढला जायचं होतं. आमचे सर्व लोक तिची खूप काळजी घ्यायचे. माहिती नाही की त्या आमच्यावर हे असे आरोप का करत आहेत?
शीझानचे कुटुंबीय म्हणाले की, तुनिषाला हिजाब घालायला लावला, दर्गाहला घेऊन गेलो आणि तिला उर्दू शिकवले, या गोष्टी खोट्या आहेत. जे फोटो सोशल मीडियावर दाखवण्यात येत आहेत, ते शूटचे आहेत. शीझान आणि तुनिषा ज्या मालिकेत काम करत होते, त्या मालिकेत उर्दू डायलॉग्ज आहेत.
शीझानची आई म्हणाली, आमचे कुटुंब एक इज्जतदार परिवार आहे. आम्ही सर्व गोष्टी समजतो. तुनिषाच्या आईने आपल्या मुलीला सोडून दिलं होतं. आपल्या वडिलांच्या निधनानंतर तुनिषा तणावात राहायची. तुनिषाची आई तिचे पैसे आपल्याकडे ठेवायची. तुनिषाला १०० रुपयेदेखील हवे असतील तर ती आईकडे मागायची. तुनिषाने एकदा शीझानला महाग गिफ्ट दिले होते. त्यावेळी शीझानने म्हटलं होतं की, इतक्या महाग गिफ्टची गरज नाही. मी पैसे देईन.
शीझानच्या परिवारने तुनिषाचे मामा पवन शर्मावर देखील आरोप केले आहे. तसेच संजीव कौशलचं देखील नाव घेतलं. संजीव कौशल हे तुनिषाच्या वडिलांचे बालपणीचे मित्र आहेत. शीझानच्या परिवाराचं म्हणणं आहे की, संजीव कौशलसोबत तुनिषाचे चांगले संबंध नव्हते. संजीव कौशल यांची इच्छा होती की, तुनिषा चंदिगढमध्ये राहावी. तिची आई वनीतादेखील यासाठी तयार होती. पण, तुनिषाला मान्य नव्हतं. तुनिषाच्या समोर संजीव कौशलचं नाव घेतलं तरी ती तणावात यायची.