Latest

लोणावळा : लोहगडावर तुंबळ गर्दी ! चार तास पर्यटक अडकले

अमृता चौगुले

लोणावळा(पुणे) : वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लोणावळा, पवना नगर, आंदर मावळ या परिसरासह येथील गडकिल्ल्यांवर लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र गत रविवारी ही संख्या जास्तच वाढल्याने त्याचे परिणाम ठिकठिकाणी दिसून आले. विशेषतः लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याने याठिकाणी अक्षरश: चार तास पर्यटक लोहगड किल्ल्यावर अडकून पडले होते. किल्ल्यावर येणारे व खाली जाणारे यामध्ये समन्वय साधत अखेर किल्ल्यावर आडकलेल्या पर्यटकांना खाली उतरविण्यात आले.

पावसाळी पर्यटन हा लोकांचा आवडता विषय झाला असून, पावसाला सुरुवात झाली की आपसूक त्यांची पावलं गड किल्ले, कोसळणारे धबधबे, डोंगरदऱ्या याकडे वळू लागतात. यासाठी सर्वाधिक पसंती मिळते ती लोणावळा आणि भाजे, मळवली परिसराला पुणे पिंपरी चिंचवड भागातील अनेक पर्यटक रेल्वे गाड्यांनी याठिकाणी येत असतात. यातील अनेकजण मळवली रेल्वे स्थानकात उतरून भाजे लेणी व लोहगड किल्ल्याकडे जाणे पसंत करतात.

गत रविवारी देखील अशाच प्रकारे हजारो पर्यटक लोहगड किल्ल्यावर गेल्याने त्याठिकाणी तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी होती की किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांना पायऱ्यांनी खाली उतरणे मुश्किल झाले होते. गडावर येणाऱ्या पर्यटकांचा लोंढा एवढा प्रचंड होता की गडावर असणाऱ्या पर्यटकांना चार साडेचार तास एकाच जागेवर खोळंबून राहावे लागले.

यामुळे अनेकदा तर पर्यटकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. सुदैवाने या सर्व गोंधळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही किंवा चेंगराचेंगरी झाली नाही अन्यथा भीषण परिस्थिती निर्माण झाली असते. या सर्व प्रकार लक्षात घेऊन पोलीस प्रशासन व पुरातत्त्व विभाग यांनी या गोष्टीचा विचार करत येणाऱ्या पुढील शनिवार रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची संख्या ध्यानात घेत किल्ल्यावर येणारे पर्यटक यांचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT