

कौलव, राजेंद्र दा. पाटील : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अजित पवार यांच्या गटात जाणे पसंत केल्यामुळे राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वालाच धक्का बसला आहे. भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील (कौलवकर) यांची भूमिका अजून अस्पष्ट असून सामान्य कार्यकर्त्यांसमोर कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न पडला आहे.
राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघातील जास्त मतदान राधानगरी तालुक्यात आहे. त्यामुळे या तालुक्यातील राजकीय घडामोडींचा मोठा परिणाम होतो. दूधगंगा वेदगंगा व भोगावती साखर कारखान्याच्या सत्ता केंद्रावरही परिणाम होतो. तालुक्यातील राष्ट्रवादीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे वर्चस्व आहे. पाटील व त्यांचे मेहुणे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात मध्यंतरी वितुष्ट आल्यानंतर राष्ट्रवादीतच गटबाजी निर्माण झाली. तालुक्यात के. पी. पाटील यांना मानणाराही मोठा गट आहे. भोगावतीच्या काठावर के. पी. पाटील यांचे जावई व भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांचाही गट आहेच. त्यांची भूमिका ही के. पी. पाटील यांच्या भूमिकेवरच ठरत असते. मध्यंतरी के.पी. व ए.वाय. यांच्यात समेट झाला असला तरी अंतर्गत गटबाजी कायम आहे.
ए. वाय. पाटील यांनी अजित पवार यांचे नेतृत्व म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. के. पी. पाटील व धैर्यशील पाटील कौलवकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
ए. वाय. यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालकपद असून गोकुळचे संचालक किसन चौगुले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील व सौ. सोनाली पाटील हे त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे प्रमुख सत्ता केंद्रे त्यांच्या गटाच्या ताब्यात आहेत. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अद्याप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसला तरी अजित पवार व त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांनी अजित पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांचा गट भक्कम दिसत आहे.
माजी आमदार के. पी. पाटील व ना. हसन मुश्रीफ यांच्यातील दोस्ताना जगजाहीर आहे. त्यामुळे के. पी. नेमके काय करणार, याकडे लक्ष लागले आहे. त्यांच्या भूमिकेनंतरच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश आबिटकर यांनी सलग दोन निवडणुकीत के. पी. पाटील यांना पराभूत करत भगवा फडकावला आहे. आबिटकर हे शिंदे सेना – भाजप आघाडीतून पुन्हा विधानसभेचे दावेदार आहेत. ए. वाय. पाटील यांची टीम आगामी विधानसभेसाठी कामाला लागली आहे.
शेवटी दोघे एकच!
राज्यातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार कार्यकर्त्याने 'शरद पवार काय अन् अजित पवार काय, के. पी. पाटील काय अन् ए. वाय. पाटील काय, शेवटी दोघे एकच, हाल तेवढे आमचे…' अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली.