Latest

पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या मनमाडसह नांदगाव तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव | Nashik Drought

गणेश सोनवणे

धरणामध्ये उरलेले जेमतेम पाणी… विहिरींनी गाठलेला तळ… अन‌् बंद पडत चालेले हातपंप, बोरवेल अशा भीषण परिस्थिती मनमाडसह नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाली असून, दाहीदिशा भटकंती करूनदेखील हंडाभरही पाणी मिळत नसल्यामुळे वाड्या – वस्त्यांवरील काही ग्रामस्थ गाव सोडून इतर ठिकाणी जात असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. (Nashik Drought)

यंदा मनमाड शहर, परिसरासह नांदगाव तालुक्यात जून महिन्यात 41 टक्के, जुलैमध्ये 75 टक्के, ऑगस्टमध्ये 16.6, तर सप्टेंबर महिन्यात 131 टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात तर तब्बल चार आठवडे पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे. पावसाअभावी खरिपाबरोबरच रब्बीचाही हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. यंदा प्रथमच पावसाळ्यात तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आले नाहीत. त्यामुळे सर्वच नदी, नाले, ओढे कोरडेठाक आहेत. नागासाक्या, वागदरडी धरणाने तळ गाठला असून, त्यात पाण्याचा केवळ मृत साठा शिल्लक आहे. उर्वरित धरणातदेखील जेमतेम पाणी उरले आहे. सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला असल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. त्यामुळे विहिरींनीदेखील तळ गाठला असून, हातपंप, बोरवेल बंद पडले आहेत. सध्या तालुक्यात 158 वाड्या-वस्त्यांवर 35 टँकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी ज्या नागासाक्या धरणातून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, ते धरणदेखील कोरडे पडले आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर वेळेवर टँकरने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्यांना पाणीटंचाईची झळ जास्त बसत आहे. (Nashik Drought)

एप्रील-मे ठरणार अधिक कडक (Nashik Drought)

मार्च महिन्यात अशी बिकट परिस्थिती असेल, तर एप्रिल, मे महिन्यांत काय होईल, याची चिंता पशुपालकांना वाटत आहे. त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ गाव सोडत असल्याचे चित्र नांदगाव तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य आणि काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. पशुधन वाचविण्यासाठी वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ आता गाव सोडत असल्याचे भयावह चित्र नांदगाव तालुक्यात दिसून येत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT