पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपा निमित्त इंडिया आघाडीने रविवार,१७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शक्तीप्रदर्शन केले. तसेच लोकसभा प्रचाराचे बिगुलही फुंकले. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. त्यांनी 'शक्ती' शब्द वापरत आपण एका शक्तीशी लढत आहोत, असे संबोधले होते. या टीकेला आज ( दि. १८ मार्च ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा येथील जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले.
जगतियाल येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "कोणी 'शक्ती'च्या नाशाबद्दल बोलू शकते का?. चंद्रयान ज्या बिंदूवर उतरले त्याला 'शिवशक्ती' असे नाव देऊन आम्ही चांद्रयान मोहिमेचे यश समर्पित केले. 'शक्ती' नष्ट करू इच्छिणाऱ्या आणि 'शक्ती'ची पूजा करणाऱ्यांमध्ये आता खरी लढाई आहे. या सामन्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्षाने जनतेच्या विश्वासाचा गैरवापर केला. त्यांच्या विश्वासघात केला. 10 वर्षे, त्याच्या स्थापनेनंतर बीआरएसने तेलंगणाची निर्दयीपणे लूट केली. आता, काँग्रेस तेलंगणाने आपले 'वैयक्तिक एटीएम' बनवले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
रविवार, मुंबईतील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की,. पंतप्रधान नरेंद्र मोदी "ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. हिंदू धर्मात 'शक्ती' हा शब्द आहे. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. प्रश्न असा आहे की, ही शक्ती काय आहे? राजाचा आत्मा 'ईव्हीएम'मध्ये आहे. हे सत्य आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. आणि देशातील प्रत्येक संस्थेत ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागात आहे. नुकतीच महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला. त्यापूर्वी ते नेते माझ्या आईसमोर रडत म्हणाले की, 'सोनियाजी, मला लाज वाटते की, या शक्तीशी लढण्याची ताकद माझ्यात नाही. मला तुरुंगात जायचे नाही.' अशा प्रकारे हजारो लोकांना धमकावण्यात आले आहे," असा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला होता.
हेही वाचा :